नागपुरात सिंधी आर्ट गॅलरी उभारणार – मुख्यमंत्री

0
15

नागपूर : सिंधू ही प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीला 5000 वर्षाचा मोठा वारसा लाभला आहे. या संस्कृतीमधूनच हिंदू संस्कृती उदयास आली आहे. सिंधी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी नागपूर येथे सिंधी आर्ट गॅलरी उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सिंधी नववर्ष आणि झुलेलाल जयंतीनिमित्त आयोजित चेट्रीचंड्र महोत्सव 2016 कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, गिरीष व्यास, राजस्थानच्या शिक्षणमंत्री वासुताई देवनानी, जबलपूरचे आमदार अशोक रोहानी, घनश्याम कुकरेजा, डॉ. विंकी रुग्वाणी आदी उपस्थित होते.

आमदार, प्रदेशाध्यक्ष ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंधी समाज संत झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतो. ही संस्कृती सिंधू आणि मोहोंजदडोच्या माध्यमातून जगासमोर आली. आज या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि पुरातत्त्वीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सिंधू हे देशाच्या फाळणीनंतर आले म्हणून ते स्थलांतरीत नाहीत. तर ते देशाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या संस्कृतीचा असलेला वारसा पुढे टिकवून ठेवणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहचवणे ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

सिंधी समाजाने देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. देशाचा विकास, उद्योग आणि व्यापारात या समाजाने मोठे कार्य केले आहे. त्यासाठी हा समाज निश्चितच अभिनंदनास पात्र असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.