नागपूर मेट्रोच्या उभारणीसाठी जर्मनच्या के.एफ.डब्लू. बँकेसोबत प्रकल्प करार

0
7

नागपूर : नागपूर शहरात वाहतूक व्यवस्थेचे एक सुंदर जाळे मेट्रो रेल्वेमुळे निर्माण होत आहे. जगातील सर्वोत्तम मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोचा लौकिक वाढेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हॉटेल सेंटर पाँईट येथे आयोजित नागपूर मेट्रो कामांसाठी जर्मनीचा के.एफ.डब्लू. बँकेसोबत प्रकल्प करार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रविण दटके, खासदार अजय संचेती, खासदार विजय दर्डा, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, समीर मेघे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वसामान्य जनतेला डोळयासमोर ठेवून वाहतूक व्यवस्था नागपुरात प्रस्थापित करण्यात येत आहे. नागपूर मेट्रो ही सर्वसामान्यांना परवडेल अशातऱ्हेने विकसित होत आहे. त्यामुळे नागपुरात मोठे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. एकविसाव्या शतकाकडे नागपुरचा प्रवास होत आहे. नागपुरात एकात्मिक वाहतुक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी 1999 ला के.एफ.डब्लू. बँकेच्या कार्यालयात मी गेलो होतो त्यावेळी बँकेच्या आशिया देशाच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी शहरातील बस व्यवस्था अधिक सक्षम केल्यावर मेट्रोचा विचार करता येईल असे सांगितले होते. आज पंधरा वर्षानंतर नागपूर मेट्रोला ही बँक वित्तीय सहाय्य करत आहे ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

मेट्रोचा मार्ग अजनी रेल्वेच्या जवळून मध्यवर्ती कारागृहाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याने नेण्याबाबत निश्चितपणे विचार करण्यात येईल. यामुळे अजनी स्थानकावरील प्रवाशांना याचा निश्चितपणे लाभ होईल. यासंदर्भात कारागृह महासंचालकांसोबत याच आठवड्यात चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. 

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात नागपूर मेट्रो रेल्वे ही 65 टक्के सोलर पॉवरवर चालविण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो रेल्वे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी यासाठी मेट्रोचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्किटेकसाठी स्पर्धा घेण्यात येऊन मेट्रोचे डिझाईन निश्चित करण्यात येईल असे सांगितले. 

नागपूर मेट्रोच्या बांधकामासाठी लागणारी रेती शासनातर्फे रेतीघाट दिल्यास बराच खर्च वाचू शकेल. मेट्रोसाठी प्रीकॉस्ट फॅक्टरी निर्माण झाल्यास मेट्रोचा खर्च 1 हजार 500 कोटी रुपयांपर्यत कमी होईल असेही गडकरी यांनी सांगितले. वर्धा रोडवरुन लंडन स्ट्रिट मार्गाने हिंगण्याकडे मेट्रो नेल्यास रेस्टॉरंट व मॉल्स मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. यासाठी मनपाने लंडन स्ट्रिटवरील जमीन मोफत देणे गरजेचे आहे. असेही गडकरी म्हणाले. 

के.एफ.डब्लू. बँकेचे भारतस्थित संचालक पिटर हिलीजेस यांनी आपल्या भाषणात के.एफ.डब्लू. बँक व नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन दरम्यान होणाऱ्या करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामासाठी के.एफ.डब्लू. बँकेने 20 वर्ष मुदतीसाठी 3 हजार 750 कोटी रुपये (500 मिलियन युरो) कर्ज स्वरुपात दिले आहे. कर्ज परतावा करण्याचा कालावधी 20 वर्ष आहे. त्यात 5 वर्षाचा मोरेटोरियमच्या कालावधीचा समावेश आहे. या रकमेतून नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, विद्युत पुरवठा, ट्रक्शन बांधकामे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने करारासंदर्भात संपुर्ण सहकार्य केले. गेल्या 6 महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकार सोबत चर्चा सुरु होती. त्याला आता अंतिम स्वरुप आले आहे असे सांगितले.

नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दिक्षीत यांनी या प्रकल्पाविषयी आपल्या प्रास्ताविक भाषणात सविस्तर माहिती दिली. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ओ.डी.ए. (ऑफिशियल डेव्हलपमेंट असिस्टन्ट) प्लस पध्दतीने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी प्रदान करण्यात आले आहे. देशात अशा प्रकारचे कर्ज स्विकारणारी नागपूर मेट्रो ही एकमेव प्रथम मेट्रो ठरली आहे. ओ.डी.ए. प्लस पध्दतीने आतापर्यंत शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी कर्ज देण्यात येत असे, त्यात पायाभूत सुविधांचा समावेश प्रथमच करण्यात येऊन नागपूर मेट्रोला त्यानुसार कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे असे सांगितले. 

नागपूर मेट्रो रेल्वेच्या कर्ज पुरवठयासाठी दुसऱ्या टप्प्यात ब्रुजेश दिक्षीत व पिटर हिलीजेस यांनी करारावर आज सहया केल्या. यावेळी डॉ. उषा राव व एस.रामनाथ हे उपस्थित होते. नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता 3 हजार 750 कोटी रुपयाचे कर्ज जर्मनस्थित के.एफ.डब्लू. बँकेतर्फे मंजूर करण्यात आले. या अनुषंगाने गेल्या 1 एप्रिल 2016 रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन ने. यांच्या उपस्थितीत केंद्रिय आर्थिक विकास विभाग व के.एफ.डब्लू. बँकेचे आशिया देशाचे महासंचालक रोलॅन्ड सिल्लर यांच्या दरम्यान करारनाम्यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती श्वेता सेलगावकर यांनी तर आभार महेश कुमार यांनी मानले. या समारंभास नगर सेवक व प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.