बाबासाहेबांचे अनुयायी बना, भक्त नव्हे – इंजि.प्रदीप ढोबळे

0
17
गोंदिया- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीसोबतच सामाजिक स्वातंत्र्याला महत्व दिले. पंरतु, स्वातंत्र्याच्या काळात आमच्या ओबीसीसह एस्सी- एसटी बांधव हा बाबासाहेबांच्या सामाजिक स्वातंत्र्याकडे न वळता महात्मा गांधीच्या भौगोलिक क्रांतीकडे वळल्यामुळेच आज ओबीसी समाज सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित आहे. त्याकाळी आपला ओबीसी बहुजन समाज हा डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांना धरुन त्यांचा अनुयायी झाला असता, तर आजचे चित्र वेगळे राहिले असते. परंतु, येथील सत्ताधारी व गैरसत्ताधारी मनुवाद्यांनी दलित, आदिवासी व ओबीसींना अनुयायी होण्याऐवजी भक्त बनविण्याकडे भर दिला. परिणामी, आपला समाज हा वैचारिकदृष्ट्या आजही मनुवाद्याच्या गुलाम राहिला. त्यामुळे बाबासाहेबांचे  चित्रातले भक्त होण्याऐवजी पुस्तकातील बाबासाहेब आपल्या मनात घडवून अनुयायी होणे, ही काळाची गरज आहे, असे मत ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे यांनी व्यक्त केले.
ते येथील प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या सार्वजनिक जयंती उत्सव कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष नरेंद्र मेश्राम हे होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त येथील प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गोंदियाच्यावतीने तीन दिवसीय ज्ञानपर्व उपक्रमाचे आयोजन सुभाष शाळेच्या प्रांगणावर करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात ओबीसी  सेवा संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, बहुजन संघर्ष समिती, सत्याशोधक समितीसह ओबीसी मधील सर्व जात संघटनांच्या सामाजिक कार्यकत्यार्ंचा समावेश होता.
प्रमख मार्गदर्शक म्हणून तेली महासंघाचे राष्ट्रीय महासचिव इंजि. राजेंद्र पडोळे  हे उपस्थित होते. अतिथी म्हणून लोकजनचे संपादक व पोवार समाज प्रतिनिधी प्रा.एच.एच.पारधी, सोनार समाज प्रतिनिधी अरुण हाडगे,  तेली समाज प्रतिनिधी डॉ. नामदेव हटवार,  वंजारी समाज प्रतिनिधी शिवाजीराव बढे,  धनगर समाज प्रतिनिधी प्रभाकर लोंढे, मांतंग समाज प्रतिनिधी डी. ए. चव्हाण,  मरार समाज प्रतिनिधी नंदलाल चौधरी, धोबी समाज प्रतिनिधी छत्रपाल कनौजिया, कुणबी समाज प्रतिनिधी सावन डोये, सुदर्शन समाज प्रतिनिधी संजू माटे, चर्मकार समाज प्रतिनिधी डी.ए‘. मालाधरी, मुस्लीम समाज प्रतिनिधी एच.एल. शेख, मोहम्म‘द फिरोज खान, दुर्गेश टंडन आदी उपस्थित होते.
ढोबळे पुढे म्हणाले की, बाबासाहेबांना युनोने देखील स्विकारले आहे. फुले, शाहू,आबेडकरांच्या नावावर आम्हाला प्रत्येकाच्या घरी जाऊन विचार सांगावे लागणार आहे. कारण येणारा काळ फारच धोकादायक असा आहे. आपल्याला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले नाॅलेजबेस लीडर घडवायचे असून होर्डींगबाज इमेजनेस लीडर नाही. सध्या देशातील बहुजनामध्ये वेगळ्याप्रकारे तणाव निर्माण करुन व्देष निर्माण करणारे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू लागले,  ज्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यात कवळीचाही संबध नाही. असे लोकच खरे देशद्रोही असल्याचेही ढोबळे म्हणाले. आपण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टया मागासलेले आहोत, हे ओबीसी समाजानेही स्विकारणे गरजेचे झाले आहे. आपल्या ओबीसी बहुजन समाजातील नेत्यांनी हायकमांड पध्दतीचा विरोध करावा. हायकमांड कल्पनाच लोकशाहीला घातक असल्याचे विचार त्यांनी मांडले.
यावेळी बोलताना तेली महासभेचे राष्ट्रीय महासचिव प्रदिप पडोळे म्हणाले की, आमचा समाज हा मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून अद्यापही मुक्त झालेला नाही. त्यामुळे त्या मनुस्मृतीचे दहन करुन सामाजिक क्रांतीचे विचार देणारे फुले,शाहू ,आंबेडकरांचे विचार समाजात पेरावे लागणार आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्ही आपल्या ओबीसी बहुजनांना फसविणारे पक्ष आहेत. यासाठी आपले चांगले शिक्षित, पण नेत्यांच्या मागे धावून त्यांची चमचेगिरी करुन आपले धंदे करणारे कार्यकर्ते बाबासाहेबांसाठी घातक झाले आहेत. अशांची मोठी भरती सध्या झाली. यापासून समाजाने सावध राहून अशांना थारा देऊ नये, असे विचार व्यक्त केले. प्रास्तविकात समितीचे अध्यक्ष एन.एस.मेश्राम यांनी बाबासाहेबांनी शिक्षणाचा दिलेला मंत्र आपण शिकू शकलो नाही. त्यामुळेच आज शासकीय शाळेतील शिक्षण महाग होऊन ते बंद पाडण्याचे षडयंत्र मनुवाद्याने रचले आहे. बाबासाहेबांनी समाज शिक्षित करा, संघटित करा आणि संघर्ष करा असे सांगितले.परंतु , आपण चुकीचा शब्दांच्या मागे धावत गेल्याने आपल्यातील स्वाभीमान हा चमचेगिरी करणाऱ्यांच्या दावणीला बांधला गेल्यानेच आपण एका मंचावर जयंती साजरी करण्यासाठी येऊ शकलो नसल्याची खंतही त्यांनी  व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थी व इतरांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी  संयोजक डॉ.मनोज राऊत, महेंद्र मडामे, कमल हटवार, लालचंद बडोले, सुरेशचंद्र काळबांधे, डॉ. सी.आर. टेंभुर्णीकर, अमर राऊत, राजेश गणवीर, सुनील भरणे,विलास वासनिक ,पकंज वासनिक यांच्यासह समितीच्या सदस्यांनी सहकायर् केले.12974370_10206042254242192_8946264738685723786_n