लाईफ लाईनच्या आरोग्य सेवेचा लाभ गोरगरीब व गरजू रुग्णांना मिळावा – पालकमंत्री बडोले

0
11

लाईफ लाईन एक्सप्रेसचा शुभारंभ
गोंदिया,दि.४ : आपला जिल्हा मागास, दुर्गम व आदिवासी बहुल आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सुद्धा फार कमी आहे. त्यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना खाजगी उपचार करुन घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोरगरीब व गरजू रुग्णांना लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज बुधवारी क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने व राज्य सरकारच्या मदतीने इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन द्वारा संचालित लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी लोकोशेड जवळ फित कापून केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एल.पुलकुंडवार, क्युरादेव फार्माचे सहायक महाप्रबंधक अशोक ‍िबयाणी, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये,विनोद अग्रवाल, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय दोडके यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ही लाईफ लाईन एक्सप्रेस जिल्ह्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी आहे. सर्व यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय करुन जास्तीत जास्त रुग्णांना या सेवेचा लाभ मिळवून दयावा. शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्ण शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष दयावे. ज्या शस्त्रक्रियेवर खाजगी रुग्णालयात एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. ही शस्त्रक्रिया येथे मोफत करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ.संजीव जयस्वाल, अशोक बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, भरत क्षत्रीय, सुनिल केलनका, अपूर्व अग्रवाल, निर्मल अग्रवाल, मिनू बिडगुजर, छत्रपाल तुरकर, डॉ.विनोद वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थींनी यांच्यासह नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी केले. संचालन ॲड.रेखा सपाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी हरीश कळमकर यांनी मानले.