व्यंगाचित्र समाज मनाचा आरसा असतात – मोहन राठोड

0
12

नागपूर : व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून वृत्तपत्र व नियतकालिकांमध्ये समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, श्रृंगारिक, क्रीडाक्षेत्र, सिनेक्षेत्र तसेच प्रबोधनात्मक विषयावरील संदेश मोठ्या खुबीने देतात. यामुळे अनेक लेखांचे काम एक व्यंगचित्र पूर्ण करते, असे प्रतिपादन माहिती संचालक मोहन राठोड यांनी आज केले.

‘कार्टूनिस्ट झोन वेलफेअर ऑर्गनायझेशन’ व ‘जिल्हा माहिती कार्यालयाच्या’ संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या सभागृहात आज ‘जागतिक व्यंगचित्र दिना’चे औचित्य साधून व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती संचालक मोहन राठोड यांनी फित कापून केले. यावेळी व्यंगचित्रकार विनय चाणेकर, जी.एन. बोबडे, विष्णू आकुलवार, राजीव गायकवाड, वैशाली पखाले, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे आदी उपस्थित होते.

मोहन राठोड म्हणाले की, व्यंगचित्रातून मिळणाऱ्या मौलिक माहितीमुळे समाजात जनजागृती होण्यास मदत होते. वेळेअभावी नागरिकांना मोठे लेख, स्तंभ, संपादकीय वाचायला वेळ मिळत नाही. परंतु व्यंगचित्राच्या माध्यमातून संपूर्ण लेखाचे सार चटकन लक्षात येऊन अर्थबोध होतो. तसेच व्यंगचित्रातील विनोद आणि कोपरखळ्यांमुळे धकाधकीच्या जीवनात करमणुकीचे व आनंदाचे क्षण मिळतात. यासाठी भविष्यात व्यंग चित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्र कलेचा समाजात जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. तसेच व्यंगचित्रकारांना त्यांच्या कलेसाठी योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्टूनिस्ट झोन वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष विनय चाणेकर म्हणाले की, जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त विदर्भातील सर्व व्यंगचित्रकारांनी एकत्रित येऊन दर्जेदार व्यंगचित्राची निर्मिती करुन समाज प्रबोधनाचे कार्य करावे. तसेच उदयोन्मुख व्यंगचित्रकारांसाठी व्यासपीठ निर्माण करावे

समाजात आतापर्यंत खूप मोठे कार्टूनिस्ट होऊन गेले त्यात बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण, सुधीर तेलंग इत्यादी. आणि सध्या कार्यरत मध्ये राज ठाकरे, शि. द. फडणीस, वसंत सरोटे, मंगेश तेंडुलकर, मनोहर सप्रे, जयंत काकडे, घनशाम देशमुख, विनय चाणेकर, राजीव गायकवाड, गणेश बोबडे इत्यादी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे काम करीत आहे.

या दोन दिवसीय व्यंगचित्र प्रदर्शनात 150 व्यंगचित्रांचा समावेश असून त्यात राजकीय, सामाजिक, श्रृंगारिक, प्रबोधनात्मक व विविध विषयांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये विदर्भातील व्यंगचित्रकारांबरोबरच मुंबई, पुणे व धुळे येथील नामवंत व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्राचा समावेश आहे. हे प्रदर्शन दि. 6 मे 2016 पर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहिल.