वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वरच्या दलित पतीनं 40 दिवसांत खोदली विहीर

0
15
विशेष प्रतिनिधी
वाशीम, दि. 8-  दशरथ मांजी यांच्या चित्रपटातील भीमपराक्रमासारखे काम वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वर येथील बापूराव ताजणे या दलीत व्यक्तीने केली आहे. सवर्ण जातीच्या शेजा-यांनी बापुरावच्या  पत्नीला त्यांच्या विहिरीचे पाणी देण्यास नकार दिल्याने बापूराव ताजणेंनी चक्क विहीर खोदली आहे. जवळपास 40 दिवसांहून अधिक काळ ते विहीर खोदत होते.
ताजणे त्यांच्या कुटुंबीयांसह वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वर गावात राहतात. त्यांनी खोदलेल्या विहिरीचा गावातील सगळ्याच दलितांना उपयोग होतो आहे. बापूराव ताजणे हे दररोज 6- 8 तासांच्या मजुरीचं काम करतात. मात्र उर्वरित राहिलेल्या तासांपैकी जवळपास 6 तास ते विहीर खोदण्यासाठी देत होते. या प्रकारामुळे शेजारी त्यांची नेहमीच टिग्गल करून त्यांना वेड्यात काढत होते. आजूबाजूच्या तीन विहिरी आणि एक बोअरवेल भीषण दुष्काळामुळे पूर्णतः कोरड्या पडल्या होत्या. त्यातच त्यांच्या या विहीर खोदण्याच्या अट्टहासामुळे लोक त्यांची चेष्टा करत होते. विहीर खोदण्यास चार- पाच जणांची गरज असताना बापूराव ताजणेंनी स्वकष्टानं एकट्याने ही विहीर खोदली. त्यांना पाणी देण्यास नकार दिलेल्या व्यक्तीचे ताजणेंनी नावंही सांगितलं नाही. गावात मला खून-खराबा आणि हाणामारी नको आहे. मात्र आम्ही गरीब असल्यानेच आम्हाला पाणी नाकारण्यात आले. त्यादिवशी मला खूप दुःख झालं, असे बापूराव ताजणेंनी सांगितले.
 पत्नीला पाणी न दिल्यामुळे आता कोणाकडे काहीच मागायचे नाही, असे ठरवल्याचे ताजणेंनी म्हटले आहे.