गडचिरोलीची संघमित्रा खोब्रागडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

0
167

गडचिरोली, ता.११: येथील राजर्षि शाहू नगरातील रहिवासी संघमित्रा रामदास खोब्रागडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली असून, अंतिम निवड यादीत स्थान पटकावले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने काल अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली, त्यात संघमित्रा खोब्रागडे यांचाही समावेश आहे. 

संघमित्रा खोब्रागडे यांचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली येथील रामपुरी नगर परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीच्या परीक्षेत त्यांनी जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला होता. बारावीनंतर पुणे येथील सीओईपी कॉलेजमधून त्यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. मागच्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची संवर्ग विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. अलिकडेच त्या रुजूही झाल्या होत्या. अशातच यूपीएससीने काल आपली अंतिम यादी जाहीर केली. त्यात संघमित्रा खोब्रागडे यांनी ८३२ वे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.