डॉ.दिलीप भुजबळनी पोलीस अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारली

0
31

गोंदिया,दि.२१ : जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी (ता.२०) पदाची सुत्रे स्वीकारली. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यांनी आज अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांचेकडून पदभार स्वीकारला.
डॉ.दिलीप भुजबळ यांची १९९२ ला राज्य सेवेतून पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड झाली. त्यांनी धुळे (शहर), पुसद व कामठी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. सप्टेंबर २००३ मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती मिळाली. मुंबई येथील परिमंडळ ७ मध्ये उपायुक्त, मुंबई येथील दंगल नियंत्रण पथक कक्षात उपायुक्त, पुणे येथील गुन्हे अन्वेशन विभागात पोलीस अधीक्षक, पुणे येथे राष्ट्रीय महामार्गमध्ये पोलीस अधीक्षक तसेच नागपूर येथे राष्ट्रीय महामार्गमध्ये पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून येण्यापूर्वी डॉ.भुजबळ हे सन २०१४ पासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.
डॉ.भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या गावचे रहिवाशी असून त्यांनी एलएलबी पदवी आणि एलएलएम ही कायदयाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी पीएचडी सुध्दा केली आहे. पीएचडी ही मानवी हक्कांबाबतच्या कायदा या विषयात केली असून त्यांच्या पीएचडीच्या शोध प्रबंधाचा विषय ‘द इम्पॅक्ट ऑफ ज्युडिसीयल डिसीजन ऑन द पॉवर ऑफ पोलीस इन क्रिमीनल इन्व्हेस्टीगेशनङ्क हा आहे. सन २०१५ मध्ये त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडीने सन्मानीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यकुशलता वाढविण्यावर डॉ.भुजबळ यांचा भर राहणार असून गुन्हे तपासामध्ये विशेष लक्ष ते केंद्रीत करणार आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम ठेवण्यासोबतच वाहतूक नियंत्रण, पोलीसांचे व्यावसायीक कौशल्य वृध्दींगत करण्याकडे लक्ष देणार आहेत. पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे. जातीय सलोखा कायम राहील आणि लोकांशी पोलीसांचे संबंध वृध्दींगत करुन ते अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याचे डॉ.भुजबळ यांनी सांगितले.