धान खरेदीत शेतकर्‍यांची लूट

0
7

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेकडून चालविण्यात येणार्‍या हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची मोठय़ा प्रमाणात लूट होत आहे. मात्र जनप्रतिनिधी व संचालक तोंडाला पट्टी बांधून बसलेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेमार्फत विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नवेगावबांध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू आहे. सदर केंद्रावर शासनाचे नियम धाब्यावर देवून मनमानीपणे व्यापार्‍यांशी संगणमत करुन खुलेआम शेतकर्‍यांची लूट होत आहे.
शासनाच्या नियमानुसार धान खरेदी केंद्रावर वजन काटे हे इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे, पण नवेगावबांध या धान खरेदी केंद्रावर साध्या काट्यानेच धान खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून हमाल प्रतिकट्टा दीड ते दोन किलोने काटा मारतात. कट्टा हा ४0 किलोचा मोजायला पाहिजे पण तो ४२ ते ४३ किलो मोजल्या जाते व काट्या मागे शेतकर्‍यांची २ ते ३ किलोने लूटमार होते. शेतकर्‍यांनी धान आणल्यानंतर त्याला धान ठेवण्याची व्यवस्था, पोच पावती देणे, टोकण देणे, शासनाचे धान खरेदी केंद्राचे नियम पटवून देणे या गोष्टी केल्या जात नाही व शेतकर्‍यांची दिशाभूल करुन व्यापार्‍यांचे धान वाम मार्गाने रेडीमेट काट्यांमध्ये मोजून आणून गोडावूनमध्ये ठेपल्या जातात.नवेगावबांध हे राजकीय वारसा लाभलेले गाव आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या क्षेत्रातील आहे. तसेच माजी आ. दयाराम कापगते हे याच गावचे आहेत. जि.प. सदस्य किशोर तरोणे, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष केवळराम पुस्तोडे, संचालक रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य कोरेटी अशा अनेक नेत्यांची फौज नवेगावबांधसारख्या ठिकाणी असताना ही गैरव्यवस्था कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी हा गैरप्रकार थांबवावा व शेतकर्‍यांची होणारी लूट बंद करावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.