सिरोंचातील चार गावे दत्तक घेणार- आमदार काशिवार

0
15

गडचिरोली-:  – भाजप सरकारचे काम विकासाला पोषक आहे. त्यानुसारच सरकारचे काम  सुरू आहे. समस्यांची सोडवणूक करून विकासाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  याअंतर्गत सिरोंचा तालुक्‍यातील चार गावे दत्तक घेण्याची ग्वाही  साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बाळा काशिवार यांनी दिली.सिरोंचा तालुक्‍यातील बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम ही चार गावे आपण दत्तक घेणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेलवार, तालुकाध्यक्ष कलाम हुसेन, शहर प्रभारी रमेश मारगौनी, बानय्या बेडके, अटला, सत्यनारायण मंचालवार, रवी गुडीमेटला आदी उपस्थित होते.

दुष्काळी भागाच्या पाहणीअंतर्गत आमदार काशिवार सिरोंचात आले असता, ते येथे पत्रकारांशी बोलत होते. सिरोंचा तालुक्‍यातील अतिसंवेदनशील बोडूकसा, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, रायगुडम ही चार गावे दत्तक घेण्याचा निर्णयही यावेळी त्यांनी जाहीर केला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील भाजप आमदार दुष्काळग्रस्त गावांना भेटी देत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साकोलीचे आमदार बाळा काशिवार हे सिरोंचा तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी या भागातील रुग्णालय, बॅंका आदींना  भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. 

याशिवाय त्यांनी काही गावांनाही भेटी दिल्या. तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी काशिवार यांनी प्रभारी तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांना चार गावांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. पंचायत समितीत त्यांनी आढावा बैठक घेऊन लोकांच्या  समस्या त्वरित निकाली काढण्याच्या सूचना केल्या. सिरोंचा येथील बॅंकेची पाहणी करून बॅंक अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या. शेतकऱ्यांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना सक्षमतेने पोहोचवा, असे ते बॅंक अधिकाऱ्यांना म्हणाले.