बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

0
14

उत्तम रोजगार, व्यवसायाच्या संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम प्राधान्याने निवडावेत

मुंबई, दि. २५ : बारावी परीक्षेचा राज्याचा यंदाचा निकाल समाधानकारक असून त्यात मुलींनी घेतलेली आघाडी पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उत्तम रोजगार आणि व्यवसायाच्या संधी
देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून मेक इन महाराष्ट्र अभियानात योगदान द्यावे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने या शैक्षणिक वर्षापासून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने ही फेरपरीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदाचा  निकाल समाधानकारक लागला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील कारकीर्द घडविण्यासाठी उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री म्हणतात, व्यावसायिक आणि निर्मिती क्षेत्रात विद्यार्थ्यांना कारकीर्द घडवता यावी यासाठी राज्यात स्वतंत्र कौशल्य व उद्योजकता विकास विभाग निर्माण करून त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. आयआयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्याची प्रक्रियाही गतीने सुरू आहे. कौशल्य विकास आराखड्यांतर्गत राज्यातील तीन कौशल केंद्रांना मान्यता देण्यात आली असून शासकीय आयटीआयच्या गुणवत्तावाढीसाठी राज्याचा ‘बॉश’सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.