लाईफ लाईन एक्सप्रेसमुळे गरीब व गरजूंचे जीवनमान वाढण्यास मदत- खा.नाना पटोले

0
5

लाईफ लाईन आरोग्य सेवा समारोप
ङ्घ ३६०० रुग्णांनी घेतला लाभ
ङ्घ ५३८ रुग्णांवर शस्त्रक्रिया
गोंदिया,दि.२५ : लाईफ लाईन एक्सप्रेसच्या जिल्ह्यात आगमनामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आल्यामुळे त्यांचे जीवनमान वाढण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
आज (ता.२५) लोको शेड जवळ, लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवा समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनचे समन्वयक डॉ.वैभव धाडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, भाजपा शहराध्यक्ष सुनिल केलनका, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
खा.पटोले पुढे म्हणाले, या एक्सप्रेसच्या माध्यमातून डॉक्टरांनी चांगली आरोग्य सेवा दिली आहे. उन्हाळाच्या दिवसात डॉक्टर्स वर्गांनी त्यांचा बहुमुल्य वेळ जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णाच्या सेवेसाठी दिला आहे. आरोग्य सेवा देण्यासाठी मुंबई, दिल्ली व अन्य शहरातील नामवंत डॉक्टर्स येथे येऊन गेलेत. अशाप्रकारची आरोग्य सेवा राज्यात स्वतंत्रपणे झाली पाहिजे यासाठी आपण सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार आहोत.
शेवटच्या माणसाला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा अशी व्यवस्था राज्यात निर्माण करणार असल्याचे सांगून खा.पटोले पुढे म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या ज्याप्रमाणे मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तशाचप्रकारे आरोग्य व शिक्षणाच्या सुविधाही महत्वाच्या आहेत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आरोग्य सुविधा चांगल्याआहेत. परंतु त्यापेक्षाही प्रभावी आरोग्य सेवा देण्याची वेळ आता आली आहे.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंत्रालयात विविध पदावर काम केल्याचे सांगून खा.पटोले पुढे म्हणाले, त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे यासाठी यंत्रणांनी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

४ ते २५ मे दरम्यान लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून २१ दिवस इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन, क्युरादेव फार्मा व राज्य सरकारच्या मदतीने जिल्ह्यातील ३६०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ५३८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. १२०९ रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येवून १९३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मिरगी आजाराच्या ९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. १७ रुग्णांवर प्लास्टीक सर्जरी करण्यात आली. अस्थी आजाराच्या २० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ५१ रुग्णांना कॅलीपर्सचे वाटप करण्यात आले. १२२ महिलांच्या गर्भाशय, ग्रीव्हा कॅन्सर व स्तन कॅन्सर याबाबत तपासणी उपचार करण्यात आले. दातांच्या विकाराशी संबंधित असलेल्या ६१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर ७७ रुग्णांच्या कानाच्या पडदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आले.
समारोप प्रसंगी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेला उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल डॉ.राजेंद्र अग्रवाल, डॉ.गौरव अग्रवाल, डॉ.योगेश पटले, डॉ.अनुप्रिया झा, डॉ.श्रीमती पोयाम, डॉ.मरस्कोल्हे, निशांत बंसोड, पवन वासनिक, डॉ.अजय सिंग, प्रा.संजय आसुटकर, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी.के.मेश्राम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थीनी, पत्रकार बांधव, विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी केले. संचालन डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलो यांनी मानले.