५ जून पर्यावरण दिवस

0
19

गोंदिया, दि.४ : जून महिना हा खऱ्या अर्थाने पर्यावरण महिना म्हणून ओखळला जातो. नैसर्गिकरित्या या महिन्यापासून पावसाळा सुरु होत असतो. पावसाळा हा शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्यांच्या दृष्टीनेही जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकताच उन्हाळा येऊन गेलेला असतो. उन्हाच्या झळांनी नको नको झालेले असताना केव्हा एकदा पाऊस येतो असे होवून जाते. पावसाचे आगमन आनंददायी-जीवनदायी असते. आपल्याकडे पहिला पाऊस आल्यावर भिजण्याची पध्दत आहे. पहिल्या पावसात भिजल्यावर आरोग्य चांगले राहते, नंतरचा पाऊसही सुसह्य होतो. पावसाळ्यात सूर्याचा प्रकाश कमी मिळतो आणि वेगवेगळे आजार होण्याची शक्यता बळावते. मात्र असे असले तरी निसर्गाचे अपरिहार्य चक्र म्हणून पाऊस अत्यावश्यकच आहे. पावसाने शेते पिकतात. आपल्याकडे अजूनही बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होत असते. शेती हा एक विषय झाला, पण पावसाने केवळ शेतेच नाहीत तर डोंगर दऱ्या, माळराने हिरवीगार होतात.
नव्याने काही झाडे उगवतात. त्यातील काही जगतातच, मात्र हा निसर्ग दोन्ही हातांनी भरभरुन आपल्याला देत असतो. वृक्षसंवर्धन करुन आपण त्याचे पांग फेडले पाहिजेत. पावसामुळे उगविणाऱ्या झाडांबरोबरच आपणही झाडे लावली पाहिजेत. त्यांची निगा राखली तरच पुढील पिढीसाठी आपण काही शिल्लक ठेवू शकू, अन्यथा ते जुन्या पिढीला नावे ठेवतील. निसर्गाच्या दृष्टीने जून महिन्याचे महत्व लक्षात घेऊन या महिन्यात १ जूनला वृक्षारोपण दिन तर ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरे केले जातात. याबरोबरच १७ जूनला आंतरराष्ट्रीय वाळवंटीकरणविरोधी संघर्ष दिनही पाळला जातो. जूनमध्ये शाळाही सुरु होतात.
ज्यावेळेस पाऊस येतो. झाडे बहरतात तेव्हा शाळांचे ताटवेही मुला-मुलींनी बहरतात. नव्या उत्साहाने नव्या वर्गात मुले दाखल होतात. याच काळात राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून काम सुरु होते. या कामाला यावेळी चांगली गती मिळाली तर खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षण करण्यास चालना मिळू शकेल. मुलांबरोबरच मोठ्यांनीही सामाजिक व वैयक्तिक पातळीवर वृक्षारोपणाचे प्रकल्प हाती घेतले तर कितीतरी काम होण्यासारखे आहे. पर्यावरण ही संकल्पना केवळ प्राकृतिक व जैविक नसून त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, बौध्दिक इत्यादी अनेक बाबींचा समावेश होतो. अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या गरजा आहेत त्याप्रमाणेच पर्यावरण, शुध्द हवा, शुध्द पाणी याही गरजा महत्वाच्या आहेत.
प्रगत राष्ट्रांनी प्रगती केली मात्र ती करताना पर्यावरणाचा बळी दिला जात आहे. यावर काहीतरी उपाय केले पाहिजेत, ही जाणीव आता सर्व जगात निर्माण झाली आहे. हे उपाय खरे तर खुपच तोकडे आहेत. प्रदूषणाचा वेग प्रचंड आहे. त्या तुलनेत उपाययोजनांची गती मर्यादीत आहे. नैसर्गिक जीवनपध्दती हेच यावर उत्तर आहे. कृत्रिम जीवनपध्दतीमुळे समाजाचे नुकसान होत आहे. राहणीमानाच्या आरामदायी सवयी या प्रकृतीला त्रासदायक ठरत आहेत. त्यातून नवनवे आजार निर्माण होत आहेत. याचा विचार झाला पाहिजे. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत जागृती होत आहे ही समाधानाची बाब आहे. पुढील काळात तरी या धोकादायक सवयींपासून नव्या पिढीची मुक्तता होऊ शकेल. तेवढे झाले तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ती खुप मोठी प्रगती ठरणार आहे. या प्रगतीला चालना मिळावी आणि पुढील पिढीच्या वाट्याला निसर्गसंपन्न जीवन यावे. असे सामाजिक वनीकरण गोंदिया परिक्षेत्राचे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी कळविले आहे.