आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मिळणार मोफत बी-बियाणे व खते

0
15

• सनियंत्रण व दक्षता समिती सभेत महत्वपूर्ण निर्णय
गोंदिया, दि.6 : सन 2016 च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा अंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खतांचा पुरवठा करण्याबाबत नुकतीच जिल्हा सनियंत्रण व दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सन 2011 पासून आजतागायत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या पात्र कुटुंबियांना शेती कसण्यासाठी मोफत बी-बियाणे व रासायनिक खते पुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शेती कसण्यासाठी बी-बियाणे व रासायनिक खते सामाजिक दायित्व म्हणून मोफत वितरण करण्याचे आवाहन कृषी संघटनांना केले. या संघटनाने सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांना यावेळी दिले. मागील 6 वर्षात आत्महत्या केलेल्या 47 पात्र शेतकरी कुटुंबास मोफत बी-बियाणे व रासायनिक खते मिळणार आहे.
या सभेत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून विविध वाणाचे 11 हजार क्विंटल व खाजगी कंपन्यांकडून 17 हजार 500 क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती दिली. खरीप हंगाम काळात शेतकऱ्यांकडून मागणीच्या वेळेस रासायनिक खतांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींना निर्देश दिले. खरीप हंगाम काळात जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने वेळोवेळी कृषी केंद्रांची तपासणी करुन व त्रुट्या आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. सभेला कृषि विभागाचे अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आवाहन
खरीप हंगाम 2016 मध्ये शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा (बियाणे,रासायनिक खते,किटकनाशके) खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातून मान्यताप्राप्त कंपनीचे व वाणाचे बियाणे घ्यावे. ‍बियाणे खरेदी करतांना बॅगवर टॅग लावलेले आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणेचे बॅगवर सिंगल टॅग म्हणजे सत्यदर्शक व डबल टॅग म्हणजे प्रमाणित बियाणे असे असते. बियाणेच्या बॅगवर लावलेल्या/छापील टॅगवर लॉट नंबर, अंतिम वापर दिनांक व इतर माहिती नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. खरेदी केलेल्या कृषि निविष्ठाचे पक्के बिल कृषि केंद्रसंचालक यांचेकडून प्राप्त करावे व बिलामध्ये लॉट नंबर/बॅच नंबर, प्रती नग किंमत नमूद आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे. बियाणेच्या पिशवीसह टॅग व पक्के बिल हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. कृषि निविष्ठाच्या बॅग/कंटेनरवर छापील किंमत पेक्षा जास्त रक्कम अदा करु नये. कृषि निविष्ठा संबंधी कोणतीही तक्रार असल्यास तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती किंवा कृषि विभाग जि.प.गोंदियाचे नियंत्रण कक्षात टोल फ्री क्रमांक 07182-230208 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
00000