आ.डॉ.देवराव होळींच्या विरोधात तलाठ्यांचा एल्गार!

0
13

गडचिरोली, ता.६: गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी तलाठी अजय तुनकलवार यांना शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेने कालपासून लेखनीबंद आंदोलन केले असून, आ.डॉ.होळी यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

२ जून रोजी गडचिरोलीचे तलाठी अजय तुनकलवार हे शहरानजीकच्या कठाणी नदीवरील रेतीघाटावर जाऊन आपले कर्तव्य बजावीत होते. यावेळी आ.डॉ.देवराव होळी तेथे आले व त्यांनी आपणास शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला, अशी तक्रार श्री.तुनकलवार यांनी ३ जून रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात केली. परंतु पोलिसांनी अद्याप आ.डॉ.होळी यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेने कालपासून लेखनीबंद आंदोलन सुरु केले आहे. आ.होळी यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर ठाकरे, उपाध्यक्ष पी.टी.तुलावी, सचिव एकनाथ चांदेकर, सहसचिव व्ही.व्ही.बांडे यांनी दिला आहे.

दरम्यान, आ.डॉ.देवराव होळी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन तलाठी श्री.तुनकलवार, अन्य तीन तलाठी व उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तलाठ्यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप आ.डॉ.होळी यांनी फेटाळून लावले आहेत.