महावितरणचा उपक्रम : घरबसल्या वीजनिर्मिती!

0
7

भंडारा : विजेची मागणी व पुरवठा, त्यातून वाढते भारनियमन यामुळे सर्वसामान्य नागरिक जेरीस येते. या पार्श्वभूमीवर शासनाने मोठ्या उद्योगांना वीज निर्मितीची दार खुली केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मोठ्या उद्योगांप्रमाणेच घराच्या छतावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प साकारण्याची नवी योजना महावितरण कंपनीने आणली आहे.

केवळ ७५ हजार ते १ लाख रुपये गुंतवून पैसे कमविण्याची संधीसुद्धा या योजनेतून मिळणार आहे. या योजनेतील कायदेशीर अडसरही शासनाने जाहीर केलेल्या अधिसुचनेमुळे दूर झाल्याने नागरिकांना घरबसल्या वीजनिर्मितीचा मार्ग खुला झाला आहे.

सौर ऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत केवळ उद्योगांनाच होती. आता मात्र निवासी, वाणिज्य व औद्योगिक वसाहतींना छतावर वीज निर्मिती करता येणार आहे. वापरानंतर वाचलेली वीज महावितरणाला विकताही येणार आहे. त्यातून पैसे कमविण्याची संधी आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रेही सहज उपलब्ध आहेत.

या संयंत्रापासून दररोज एक ते आठ किलोवॅट वीजनिमीर्ती करता येते. सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॅट, थ्री फेस ग्राहक १५० किलोवॅट वीज निर्माण करू शकतो. महानगरपालिका क्षेत्रात १५० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतो. तर अन्य क्षेत्रातील ग्राहक ८० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्मिती करू शकतो. दिवसा निर्माण होणारी वीज गरजेपेक्षा निश्चितच अधिक राहील. न वापरलेली वीज नेट मिटरिंगद्वारे महावितरणला विकता येईल. या योजनेसाठी महावितरणकडे ग्राहकांना आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहे. लिफट, पाण्याची मोटार व लाईटसाठी ही वीज वापरता येईल. सध्या विजेचा दर सरासरी सात रुपये असा आहे. या योजनेमुळे सामान्य नागरिकांवरील विजदराचा भार काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.