आता एकच लक्ष लावूया २ कोटी वृक्ष– प्रा.सविता बेदरकर

0
32

वैश्विक उष्णतेमुळे होणारी प्रचंड तापमान वाढ आणि हवामानातील बदलामुळे पर्यावरणाबाबत जागतिक स्तरावर विचार मंथन सुरु झाले आहे. हवामान बदलामुळे संबंध जीवसृष्टी मेताकुटीला आली आहे. बदलत्या पर्यावरणात समतोल साधला जावा म्हणून शासनाचे विविध विभाग आणि लोकसहभागात १ जुलैला दोन कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित केले आहे.
पाऊस पाहिजे ?तापमान पाहिजे कमी पाहिजे? जमिनीत पाण्याची पातळी वाढली पाहिजे ? इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहिजे ? निसर्गाच्या बदलत्या चक्राला संतुलीत करण्यासाठी लोकचळवळीतून लावूया दोन कोटी वृक्ष !
झाडे आपल्याला काय देतात ! एक झाड ५० वर्षात ३५ लाख रुपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. एक झाड ४० लाख रुपये किंमतीचे पाण्याचे डिसाइक्लिंग करते. एक झाड एका वर्षात ३ किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते. एक परिपूर्ण झाड एक हजार मानवांचे जेवण शिजविण्यासाठी उपयोगी पडते. एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान २ डिग्री अंशाने कमी करते. एक झाड १२ विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते. एका झाडापासून कुटुंबासाठी लाकडी सामान तयार होते. एका झाडावर १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या २५ पिढ्या जन्माला येतात. मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते. एक झाड १८ लाख रुपये किंमतीचे जमिनीची धुप थांबते. एक झाड माणसाला लहानपणीच्याय पाऊलपणापासून ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्क्यातील हातातील काचेपासून स्मशानातील लाकडापर्यंत साथ देते. एक झाड आपल्या पालापाचोळ्याची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळे, फुल, बिया आपल्याला देते.
एक झाड ५० वर्षात काय करते आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा मुद्दामच मांडत आहोत, जेणेकरुन प्रत्येक माणूस याचा विचार करेल. आता नाही तर कधीच नाही. तुमची आमची मुले पाठीला ऑक्सीजनचा सिलेंडर लावून फिरताना कधी दिसतील याचा विचार करा. जगातील सर्व पैसा जरी गोळा केला तरी आपण ६ महिने पुरेल येवढा ऑक्सीजन तयार करु शकत नाही. मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा की, असं कुठलं स्त्रोत तुमच्याकडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सीजन तयार करु शकतो. तासभर ऑक्सीजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो. म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगून गेली, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.
पर्यावरण म्हणजे एनव्हारॉनमेंट हा शब्द एनव्हायरॉन या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रीया-प्रतिक्रिया व आंतर क्रीयामधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा याचा अर्थ होतो. या परिस्थितीवरच संबंध जीवसृष्टी आणि वसुंधरेचे अस्तित्व अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरणामुळे, जंगलावर होणारे अतिक्रमण, नैसर्गीक साधन संपत्तीचा बेसुमार झालेला उपसा, गोड्या पाण्याचा मर्यादित साठा, यामुळे केवळ मानव जातच नव्हे तर संबंध जीवसृष्टी धोक्याच्या सीमेवर येऊन ठेपली आहे.
..२

..२

निसर्गाचा हिरवा शालू पांघरला आहे तो विदर्भातील जैव विविधतेनी नटलेल्या सदाहरित जंगलांनी. ही सदाहरित जंगले पर्यटकांना खुणावीत असतात. जंगलांना पृथ्वीची हिरवी फुफ्फुसे संबोधिली जाते. मेघांना जंगलाचे भारी आकर्षण. झाडे जमिनीची धूप होऊ देत नाही आणि पावसाचे पाणी जिरवून घेतात. मातीच्या सर्जनशिलतेचे जतन वृक्षवेली करीत असतात. वसुंधरेच्या ललाटावर हिरवा मरवट भरण्यासाठी प्रत्येकाने किमान दहा झाडांचे जतन-संवर्धन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
जगातील सगळ्यात दरडोई झाडांचे प्रमाण आपल्या देशात आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीमागे केवळ २८ झाडे आहेत तर कॅनडामध्ये ८९५२ झाडे आहे. आता वॉर फुटींगवर झाडे वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या वनधोरणानुसार ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादीन असणे गरजेचे आहे. पण राज्यातील हे प्रमाण कमाल २० टक्के आहे. जागतिकस्तराचा विचार केला तर वातावरणाचे संरक्षक कवच ओझोन वायुच्या थराला चीनच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्र झाले आहे. ओझोनचा थर असाच विरळा होत राहिला तर सूर्याची अतिनिल किरणे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. कारण झाडे ही प्रदूषणाची चाळणी आहे. करंज, पिंपळ शंभर टक्के कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करते. मानवाला जगण्यासाठी प्रत्येक क्षणाला ऑक्सीजनची गरज भासत असते. पण वसुंधरेकडून घेवून तिला काय दिले. स्वच्छ सुंदर वसुंधरा तर आरोग्य नांदेल घरा घरा, परिसर असेल हिरवागार तर आरोग्य राहील सदाबहार अशी म्हणच आहे.
जर आपण वेळीच सावरलो नाही तर गावागावात ऑक्सीजन पार्क उभारावे लागतील. पेट्रोलपंपासारखे ऑक्सीजन पंप तयार करावे लागतील. म्हणून वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी हवामान, पाण्याची उपलब्धता व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन वड, पिंपळ, शिसम, अगस्ती, चिंच, फणस, बेल, सप्तपर्णी, काशीद, सोनमोहर, चाफा, महुआ, जांभूळ, बेहळा, कडुनिंब, करंजी, आवळा इत्यादीसारखी झाडे लावावी लागतील.
भावी पिढीला वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय तरणोपाय नाही. केवळ झाडे लावून हात झटकायचे नाही. झाडांचे रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्केपेक्षा अधिक राहावे यासाठी सुध्दा शासन आणि आपणास सजग राहावे लागेल. वृक्षारोपणासाठी व संरक्षणासाठी त्यांच्या क्षेत्रातील जनतेला आवाहन करुन त्यांना या कार्यक्रमात सामावून घेण्याबाबत सहकार्य मिळवावे लागेल. यासाठी जनप्रतिनिधी आणि जनतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पुढच्या पिढ्यांचे जगणे अवघड होवू नये आणि आपणास जबाबदार धरले जावू नये तर वसुंधरेला हिरव्या शालूने नटविल्याशिवाय तरणोपाय नाही. या निमित्ताने एकच आवाहन करावेसे वाटते, आता एकच लक्ष १ जुलैला दोन कोटी वृक्ष ! लक्षात ठेवा वृक्ष जगतील तर तुम्ही जगाल ! स्वत:ला जगविण्यासाठी वृक्षांना जगविणे हा एकच पर्याय आपणासमोर शिल्लक आहे. झाडे जगतील तरच भावी पिढी जगेल. म्हणूनच संत तुकडोजी महाराज म्हणतात, वृक्ष सर्वांची सेवा करीता, छाया पुष्पे, फळे देतो. शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी