नागपूरच्या स्नेहलता तागडेची राष्ट्रीय नाटय़ विद्यालयासाठी निवड

0
10

नागपूर-विविध एकांकिका स्पर्धा आणि हौशी रंगभूमीवर अभिनायाची चुणूक दाखवणारी स्नेहलता तागडे या रंगकर्मीची राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (एनएसडी) च्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. रंगकर्मीसाठी एनएसडीमध्ये निवड होणे म्हणजे अतिशय सन्मानाचे समजले जाते. त्यासाठी नवोदित कलावंत वर्षांनुवर्षे परिश्रम घेतात. मात्र, कलावंतांना एमएसडीमध्ये संधी मिळत नाही. स्नेहलता गेल्या तीन वर्षांपासून यासाठी प्रयत्न करीत होती आणि अखेर तिची निवड झाली. देशभरातील २७ विद्यार्थ्यांची या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. यात महाराष्ट्राच्या पाच रंगकर्मीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पाचही रंगकर्मीमध्ये चार मुली आणि एक मुलगा आहे. त्यात अभिलाषा पौल, अश्लेषा फाड, अश्विनी जोशी, सलिम मुल्ला आणि नागपूरचा स्नेहलताचा समावेश आहे. विदर्भातून ती एकमेव विद्यार्थिनी आहे. स्नेहलता मुळात नृत्यांगणा असून ती गेल्या काही वर्षांत नाटकांकडे वळली. त्यात ती मेहनत घेत आहे. ‘मुघलांनी सत्ता दान केली’ आणि ‘विश्वनटी’ या एकांकिकांमध्ये तिने अभिनयाची चुणूक दाखवून पुरुषोत्तम करंडकमध्ये राज्यातून सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकवला आहे.