रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा – डॉ.विजय सूर्यवंशी

0
16

जिल्हास्तरीय कार्यकारी समिती सभा
गोंदिया,दि.२६ : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. स्वच्छता असेल तर समृध्दी येते तेथे आरोग्य निरोगी राहते. कोणत्याही व्यक्तीने उघड्यावर शौचास बसू नये. प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधून रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
२३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा संपन्न झाली. यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे शौचालय बांधण्यास अडचण नाही. कोल्हापूर व पालघर येथे शौचालय बांधण्याची योजना राबविण्यात आली. त्याच धर्तीवर या जिल्ह्यात जास्तीत जास्त शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावा. कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेला तर त्यांनी मुलांना प्रथम शौचालयाबाबत विचारावे. शाळेत हँडवॉश स्टेशन निर्माण करुन विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याच्या सवयी लावाव्यात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी करतांना त्यांच्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे. पोलीस विभागाने गुड मॉर्निंग पथकास सहकार्य करावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक करुन महिला बचतगटांना १०० टक्के शौचालय असल्याशिवाय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा पुरवठाच करु नये. सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय बांधले आहे काय याची खात्री करुन घ्यावी.
शौचालय बांधकामाला वेग येण्यासाठी ग्रामसेवकांच्या स्पर्धा निर्माण कराव्यात असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना शौचालयाचे महत्व व त्यामुळे होणाऱ्या आजाराची माहिती दयावी. जिल्ह्यातील माविमच्या महिला बचतगटातील ६० सहयोगीनींच्या स्पर्धा निर्माण करुन ग्रामसभेच्या माध्यमातून शौचालय बांधकामाला वेग आणण्याचे काम करावे. महिला बचतगटांच्या ज्या सहयोगीनी शौचालय बांधण्याबाबत उत्कृष्ट काम करतील त्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शौचालय बांधण्याबाबत स्थानिक केबलवरुन क्लीप दाखविण्यात यावी. शौचालय बांधण्याबाबतचे पॉम्पलेटस् छापून गावागावात वितरीत करावे. गवंड्यांची गावनिहाय यादी तयार करावी. गोंदिया शहरातील मामा तलावाच्या शेजारी कोणीही शौचास बसू नये. जिल्ह्यात नविन तयार होणाऱ्या घरात वीज जोडणी देतांना शौचालयाची खात्री करुन घ्यावी. ज्या घरात शौचालय नसेल त्या घरी नव्याने वीज जोडणी देवू नये. जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी शौचालय बांधलेच पाहिजे असा आग्रह डॉ.सूर्यवंशी यांनी केला.
सभेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण, जि.प.वरिष्ठ लेखा अधिकारी श्री.जवंजाळ, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक अनिल गुजे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.वाबळे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिक्षक डी.एस.लोहबरे,यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.