दप्तरविरहित उपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकाऱ्यांचे आईवडील

0
9

खेमेंद्र कटरे berartimes.com
गोंदिया,दि.८ : विविध शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात नावलौकीक मिळविलेल्या गोंदिया जिल्ह्याने आज ८ सप्टेबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिन साजरा करुन वाचनाचा आनंद अनुभवला. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेमधूनच वाचनीय पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. या पुस्तकामध्ये थोर पुरुषांचे जीवनचरित्र, छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना दप्तरविरहित दिनामुळे सुट्टी देण्यात आली असली तरी आजचा दिवस पदमपूरवासियांसाठी मात्र एक वेगळी पर्वणी देणारा ठरला.ते असे की,जिल्ह्याचे उपक्रमशील व लोकाभिमुख जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याच संकल्पनेतून जो दप्तरविरहित दिवस आज जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.त्याउपक्रमाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकारी साहेबांचे वडील नामदेवराव सूर्यवंशी आणि आई सुशिलाबाई सूर्यवंशी.ते नुसते सहभागीच झाले नाही,तर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने सवांद साधत आपले बालपणाच्या आठवणींना वाट मोकळी करुन दिली.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आईवडील देखील या दप्तरविरहित दिनाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यांची उपस्थिती तर अनेकांना प्रेरणादायी ठरली. नामदेवराव सूर्यवंशी हे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आई सुशिलाबाई हया राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापीका आहेत.त्यामुळे दोघांचेही मन शाळेतील विद्यार्थांत असे रमले की,आई सुशिलाबाईंना तर त्यांच्या शाळेतील विद्यार्थांचे चेहरे पदमपूरच्या विद्यार्थांना बघून आठवू लागल्याचे त्यांच्या चेहर्यावरील हावभावावरुन दिसत होते.त्यांनी मनमोकळपणाने विद्यार्थ्यांच्या वर्गात जावून त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले.तेव्हा विद्यार्थांनाही आपण कुणा अधिकार्याच्या आईवडीलासोंबत सवांद साधत असल्याचे नव्हे तर आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी सवांद साधत असल्याची अनुभूती वाटली.
शालेय विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी, विविध वैचारीक स्वरुपातील पुस्तके वाचून विद्यार्थ्यांची सकारात्मक विचारसरणी तयार व्हावी तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी विद्यार्थ्यांनी दप्तरविरहित दिनाच्या निमित्ताने पुस्तके वाचनाचा आनंद घेतला. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांसोबतच गावात व शेजारच्या गावात असलेल्या सार्वजनिक वाचनालयातून वाचन आनंद दिवसासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वाचानाची आवड निर्माण होऊन वाचन चळवळ भक्कम करण्यासाठी दप्तरविरहित दिवस उपयुक्त ठरल्याचा अांनद बघावयास मिळाला.unnamed-5
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांना पदमपूर गावाचे वैशिष्ट्य विचारले. महाकवी भवभूतीचा इतिहास सुध्दा विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला. कोणकोणती पुस्तके वाचता, शाळा सुटल्यानंतर काय करता, सकाळी किती वाजता उठता, कोणाच्या घरी शौचालय नाही याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. फुटबॉलपटू रोनाल्डो, मेसी, ऑलिम्पीक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची माहिती, संत पद मिळालेल्या मदर टेरेसा यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना त्यांनी दिली.याचवेळी एका विद्यार्थांने जिल्हाधिकारी पदावर जाण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली असा प्रश्न बिनधास्त विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनीही आईवडील हे सांगताच आईवडील हे प्रेरणादायी आणि पहिले गुरु असतात हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले.