जिल्हाधिकारी काळे यांनी केली बिहिरीया येथील सेंद्रीय शेतीची पाहणी

0
11

गोंदिया,दि.२८ : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी २७ ऑक्टोबर रोजी तिरोडा तालुक्यातील बिहिरीया या गावाला भेट देवून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार श्री.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी श्री.पोटदुखे, सरपंच प्रमिला पटले, उपसरपंच मदन पटले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सेंद्रीय शेती करणाऱ्या टेकचंद जमईवार, नंदकिशोर जमईवार, रेवाशंकर पटले, दिनेश जमईवार यांच्या शेतीची पाहणी करुन त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सेंद्रीय व रासायनिक शेतीतील पिकाची तुलना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली. सेंद्रीय शेतीतील पिकामध्ये किड व रोगाचा प्रादुर्भाव नगण्य प्रमाणात असून पिकही जोमदार असल्याचे तसेच या शेतीतील पिकासाठी किटकनाशक व खताचा खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले. या शेतीतून यावर्षी भरघोष उत्पन्न मिळणार असल्याचेही या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. उलट त्यांच्याकडे असलेल्या रासायनिक शेतीच्या पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असून यावर नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर करण्यात आल्यामुळे या शेतीसाठी खर्च आल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील सेंद्रीय शेती व रासायनिक शेतीचे पीक बघितले. त्यांना सेंद्रीय शेतीतील पीक अत्यंत चांगल्या स्थितीत दिसून आले. सेंद्रीय शेतीचे प्राथमिक निष्कर्ष आश्वासक असून उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यताही त्यांनी विशद केली. सेंद्रीय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असून धानाला चांगला भावही मिळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पीक पाहणी प्रसंगी सांगितले.
शेतकऱ्यांनी तयार केलेल्या कृषि प्रदर्शनास जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरही शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. सेंद्रीय प्रात्यक्षीक कापणीच्यावेळी प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना केली.