सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हरविलेल्या बालिकेला मिळाली आई

0
14

गडचिरोली,दि.११-दैनंदिन कामकाजासाठी धावपळ करताना एक काम सोडून दुस-याच्या मदतीला धावून गेलो, तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. याच भावनेतून गोकुळनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळू मडावी, अपर्णा खेवले व आशा मेश्राम यांनी बाजारात हरविलेल्या एका लहानग्या मुलीला तिच्या आईची भेट घडवून दिली.

त्याचे झाले असे की, आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोकुळनगर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळू मडावी, अपर्णा खेवले व आशा मेश्राम बाजारात जात होते. यावेळी १४ महिन्यांची एका बालिका शहरातील पटेल सायकल स्टोअर्सजवळ रडवेल्या चेहऱ्याने पायी चालत असताना त्यांना दिसली. तिच्या हावभावावरुन ती हरविली असावी, असा अंदाज करुन बाळू मडावी, अपर्णा खेवले व आशा मेश्राम यांनी तिची चौकशी केली. यावेळी त्यांनी बाजारओळीत उपस्थित नागरिकांनाही विचारपूस केली. परंतु कुणीही तिचे पालकत्व स्वीकारले नाही. यामुळे त्‍यांनी त्या लहानग्या मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले. ही बातमी कळताच दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास त्या मुलीची आई पोलिस ठाण्यात पोहचली. आईला दुरुन बघताच ती बालिका धावत येऊन तिला बिलगली. ही मुलगी राम मंदिराजवळील श्री.जवळे यांच्या घरी आपल्या परिवारासह भाड्याने राहते, अशी माहिती नंतर पोलिसांनी दिली.

सामाजिक दायित्व जोपासल्यामुळे एका मुलीला हरविण्यापासून वाचविल्याबद्दल बाळू मडावी, अपर्णा खेवले व आशा मेश्राम यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.