अल्पवयीन पिढी ‘परवाना’विनाच रस्त्यांवरून ‘सुसाट’

0
12

गोंदिया-दि.22- – सोळा ते अठरा वर्षे वयोगटातील तरुणांना ५० सीसी क्षमतेपर्यंतचे वाहन चालविण्यासाठी परवाना दिला जातो. मात्र, जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांनी ५० सीसीपर्यंतच्या वाहनांचे उत्पादन बंद केल्याने चाचणीसाठी कोणते वाहन आणायचे व लायसन्स मिळवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाल्याने आरटीओ विभाग व वाहनधारकांसाठी ही बाब डोकेदुखी ठरत आहे. स्वाभाविकच यामुळे ५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांवरील अल्पवयीन पिढी ‘परवाना’विनाच रस्त्यांवरून ‘सुसाट’ धावते व वाढत्या अपघातांचे हे प्रमुख कारणही मानले जात आहे. महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ४ (१) व केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मधील तरतुदीनुसार १६ ते १८ वर्षे वयोगटातील उमेदवारांना ५० सीसी क्षमतेपर्यंतचे वाहन (विदाऊट गिअर) चालविण्यासाठी परवाना (लायसन्स) दिले जाते. याच कायद्यात विनापरवाना वाहन चालविल्यास संबंधित अल्पवयीन चालकास नव्हे, तर वाहनमालकास तीन महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे.

५० सीसी क्षमतेची वाहने जवळपास बंदच झाली आहेत. टीव्हीएसची मोपेडही ८० सीसीची आहे. १८ वर्षांखालील तरुणांसाठी वाहन परवाने देण्याचा प्रश्‍न असेल, तर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनावर सवलती देऊन त्याबाबत तरुणांमध्ये जनजागृती केल्यास पर्यावरणातील प्रदूषणही कमी होऊ शकते. आज हजारो वाहने रस्त्यांवरून धावत असताना बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

नेमकी अडचण काय?
या परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर सुरवातीला लर्निंग लायसन्स दिले जाते. ठराविक कालावधीनंतर ते कायम करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे संबंधित उमेदवाराची चाचणी (ट्रायल) घेतली जाते. ही चाचणी देताना संबंधित उमेदवाराकडे ५० सीसी क्षमतेचे वाहन असणे अपेक्षित आहे. मात्र हे वाहनच उपलब्ध नसल्याने उमेदवार चाचणी नेमकी कोणत्या वाहनाची देईल? हा खरा प्रश्‍न आहे. ५० सीसी क्षमतेची जुनी वाहने जवळपास कालबाह्य झाली आहेत.

तरुण पिढी ‘सुसाट’
साधारण पाच-सहा वर्षांपासून या स्वरूपाचे परवाने मागणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली आहे. स्वाभाविकच स्कूटी, ॲक्‍टिवा, प्लेझर यासारख्या १०० सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांवरही ‘सुसाट’ धावणारी तरुण पिढी विनापरवानाच धावतेय, ही वस्तुस्थिती आहे. उघडपणे हे चित्र दिसूनही आरटीओ अथवा वाहतूक पोलिस यंत्रणा या वाहनधारकांवर कारवाई करू शकत नाही, हेही कायद्यातील अडचणीमुळे समोर आलेले दुर्दैवच म्हणावे लागेल.

‘ती’ वाहने कालबाह्य
जोपर्यंत ५० सीसी क्षमतेपर्यंतच्या वाहनांचे उत्पादन विविध कंपन्यांकडून होत होते तोपर्यंत या प्रकारातील परवाने मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यानुसार पात्र उमेदवारांना हे परवाने दिलेही जात होते. आता मात्र गेल्या काही वर्षांपासून वाहन उत्पादक कंपन्यांनी ५० सीसी क्षमतेपर्यंतची वाहने उत्पादित करणेच बंद केले आहे.