देवेंद्र व माझा संसार सुरळीत-ना.गडकरी

0
15

नागपूर,दि.02-‘ईर्ष्या, महत्त्वाकांक्षा हा राजकारणाचा नैसर्गिक भाग आहे. पण माझ्यात आणि देवेंद्रमध्ये एक भाग आहे, तो म्हणजे एकोपा. पटलं तर या, नाहीतर नका येऊ, हा माझा स्वभाव! तर प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याचा देवेंद्रचा स्वभाव. यामुळेच काही कटू निर्णय घ्यायचे असले की, देवेंद्र सर्वांना माझ्याकडे पाठवतो. पण अशा दोघांच्याही वेगवेगळ्या स्वभावाचा फायदा निर्णय घेताना होतो. मात्र दोघांचाही संसार सुरळीत आहे’, अशी स्पष्ट कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

‘नागभूषण फाउंडेशन’चा नागभूषण पुरस्कार रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणाचा प्रवास त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी उलगडला. हसत-खेळत झालेल्या या कार्यक्रमात गडकरींनीदेखील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्दी कशी व कुठून बहरली?, ते नेमके राजकारणात कसे आले? हे सांगताना त्यांनी विनोद गुडधे पाटील पक्षातून बाहेर गेले आणि देवेंद्रना तिकीट मिळाल्याची आठवण दिली. ‘त्यावेळी जो कुणी भाजप सोडून जाईल, तो हा बामणांचा पक्ष म्हणून बाहेर जात होता. पण आज परिस्थिती वेगळी आहे. बहुजनांचे सर्व क्रीम आमच्या पक्षात आहे. धरमपेठ, रामदासपेठपेक्षा अधिक मतं झोपडपट्टी, रेड लाइटमध्ये मिळतात. सर्व चोर, लोफर, बदमाश आमच्याकडे आहेत. पण पक्षाला आज आलेल्या वैभवाचे कारण याआधीच्या पिढीने दिलेला संघर्ष आहे. देवेंद्रचे वडील गंगाधरराव आणि त्यावेळच्या नेत्यांचा त्याग यामागे आहे. गंगाधररावांच्या मेहनतीचा वारसा देवेंद्रला मिळाला. त्यातूनच तो आज या स्तरावर पोहोचला आहे,’ असे गडकरी म्हणाले.

सत्काराच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनीदेखील नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. ‘आमच्या दोघांचा स्वभाव वेगळा आहे. पण गडकरींकडून काही शिकायचे असले तर लढाऊ वृत्ती! कितीही संकट आलेत, तरी त्यांचा उत्साह कमी होत नाही. यापासूनच मी सकारात्मकता शिकलो. माणसं कधीच वाईट नसतात. परिस्थिती त्यांच्यातील चांगुलपणा हिरावून घेते. यासाठीच आलेल्या प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. जनतेचा विकास करण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे. सचिवांना नाही, हे गडकरींनीच सांगितले. यामुळेच जनहिताचा निर्णय असल्यास बिनधास्त घेतो, कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही, हे शिकता आले’, असे मुख्यमंत्री म्हणाले.