नोटाबंदीसंदर्भात पंतप्रधानांनी देशवासीयांची माफी मागावी-आ.विजय वडे्टीवार

0
10

गडचिरोली,दि.२: नोटाबंदीचा फायदा गोरगरीब जनतेला अजिबात झाला नसून, अर्थव्यवस्था मोडकळीस आल्याचे नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी फसलेल्या नोटाबंदीचे प्रायश्चित्त म्हणून देशवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, रिपाइं नेते अॅड.राम मेश्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, नगरसेवक सतीश विधाते, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष लता ढोक, रजनिकांत मोटघरे, नीतेश राठोड, पुरुषोत्तम मसराम, पांडुरंग घोटेकर उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजपकडे आलेल्या नवीन नोटांचा हा परिणाम आहे. मात्र पराभवाला चुकीच्या उमेदवारांची निवड व कुणाशीही आघाडी न करणे, या बाबीही कारणीभूत असल्याचे आ.वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन समविचारी पक्षांशी आघाडी करण्यात येणार आहे. त्यासाठी विधानसभानिहाय मेळावे घेण्यात येणार असल्याचेही आ.वडेट्टीवार यांनी सांगितले.नोटाबंदीनंतर देशात १३१ धाडी टाकण्यात आल्या आणि ६३९ कोटी रुपये पकडण्यात आले, त्यातील बहुतांश रक्कम भाजप नेत्यांकडेच सापडली, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
फसलेल्या नोटाबंदीबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, तर ८ जानेवारीला तहसीलदारांना घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आ.वडेट्टीवार यांनी दिली.