रद्द नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

0
5

नागपूर, दि. 2 – रद्द झालेल्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलवू किंवा निर्धारित बँकेत जमा करू न शकलेले नागरिक या नोटा रिझर्व्ह बँकेत ३१ मार्च २०१७ पर्यंत जमा करू शकतील, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने आता या नोटा स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही सवलत केवळ विदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी (एनआरआय) असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी नागपुरातील आरबीआयच्या कार्यालयात जुन्या नोटा जमा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची घोषणा केली. नागरिकांजवळ असलेल्या जुन्या नोटा ते ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये बदलवू किंवा जमा करू शकणार होते. जे नागरिक ठरलेल्या मुदतीत त्यांच्याजवळच्या जुन्या नोटा बदलवू अगर खात्यात जमा करू शकले नाहीत त्यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात त्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची सवलत पंतप्रधानांनी त्यावेळी जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने तसे परिपत्रकही काढले होते. प्रसार माध्यमांकडूनही त्यानुसार प्रचार करण्यात आला होता.

मात्र आतापर्यंत अनेक वेळा नवीन घोषणा करणाऱ्या सरकारप्रमाणेच रिझर्व्ह बँकेने नवीन परिपत्रक काढून रद्द झालेल्या नोटा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. या ना त्या कारणाने ५० दिवसांत जुन्या नोटा बदलू अगर खात्यात जमा करू न शकलेल्या नागरिकांनी ३० डिसेंबरची मुदत संपल्यानंतर सोमवारी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली. दोन दिवस सुट्या असल्याने सोमवारी बँक उघडताच नागपूरच्या रिझर्व्ह बँक कार्यालयासमोर लोकांची गर्दी जमा झाली. रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटा घेऊन काही लोक त्या बदलण्यासाठी तर काही त्या नोटा खात्यात जमा करण्यासाठी आले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने या नोटा जमा करण्यास स्पष्ट नकार दिला. ३१ मार्चपर्यंतची सवलत विदेशात राहणारे भारतीय किंवा ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरच्या काळात विदेशात असलेल्या नागरिकांसाठीच असल्याचे नोटीसच बँकेने कार्यालयासमोर लावले आहे. त्यामुळे नोटाबदलीसाठी बँकेत आलेल्या नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आरबीआयने वेळेवर अशाप्रकारची नोटीस लावून सामान्य नागरिकांना फसविल्याचा आरोप नागरिकांनी केला.