विहिरीत पडलेल्या चितळाला वनकर्मचाऱ्यांनी दिले जीवदान

0
12

गडचिरोली,दि. 27: पाण्याच्या शोधात गावात आलेला चितळ विहिरीत पडल्यानंतर काही क्षणातच वनकर्मचाऱ्यांनी कर्तव्यतत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतल्याने चितळाचे प्राण वाचले. ही घटना संध्याकाळी ६ वाजता गडचिरोलीनजीकच्या विश्रामपूर येथे घडली.
त्याचे झाले असे की, संध्याकाळी एक देखणे चितळ विश्रामपूर गावात आले. भटकत असताना ते रस्त्यालगत असलेल्या बसथांब्याजवळच्या शेतातील विहिरीत पडले. साधारणत: १० फूट खोल असलेल्या या विहिरीला तोंडी नाही. विहिरीत पाणी नव्हते. मात्र तळाला चिखल होते. विहिरीत पडताच चितळ चिखलात रुतून बसले होते. चितळ पडल्याचे समजताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. काही जागरुक नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना माहिती देताच वनपाल अरुण पेंदोरकर, बोदली बिटाचे वनरक्षक सुनील पेंदोरकर, बामणी बिटाचे वनरक्षक अतुल धात्रक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्राधिकारी एम.पी.चांगले यांनीही घटनास्थळ गाठले. सर्वांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने चितळाला सुखरुप विहिरीतून बाहेर काढून जंगलात सोडले.