होय, मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो!

0
20

गोंदिया,(berartimes.com)दि.30-जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुमार म्हणून पालकांनी खासगी शाळांची वाट धरली. सरकारी शाळा ओस पडल्या. शिक्षक अतिरीक्त ठरले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करू लागले. ही परिस्थिती बदलण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, सीईओ यांच्यासह अनेक बडे अधिकारी अभिमानाने ‘जिल्हा परिषद शाळेत शिकलो’ असे सांगत आहेत. जिल्हाभर होर्डिंग झळकले आहे. या अभियानाचा परिणाम म्हणून सत्र सुरू होण्यापूर्वीच १० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी ‌जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे. सोशल मीडियावरही हे अभियान चर्चेचा विषय ठरले आहे.
‘प्रत्येक मूल शिकले पाहिजे आणि टिकले पाहिजे’, हे ब्रीद घेऊन गोंदिया जिल्हा परिषदेने दोन वर्षांपासून ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गाव पातळीवर किती मुले पहिल्या वर्गात प्रवेश घेऊ शकतात याची नोंदणी करण्यात आली. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत २८ मार्चला १० हजार ९२२ विद्यार्थ्यांची नावे जिल्हा परिषद शाळांमधील पहिल्या वर्गात दाखल करण्यात आली. कुठे वाजत गाजत तर कुठे बैलबंडीने नवागतांना शाळेत आणण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनही मोठे होता येते हे सांगण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग लक्ष वेधून घेत आहेत.
होर्डिंगवर ‘काय कुणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सनदी अधिकारी झाले आहे काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर ठकपणे ‘होय’ असे नमूद करून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे छायाचित्र, पद नमूद करण्यात आले आहे. सोबतच महाराष्ट्रातील दहाहून अधिक सनदी अधिकारी, बडे अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतच शिकल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता दाखवित जिल्ह्यातील प्रत्येक मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद शाळांमध्ये काय आहे, हे सांगण्यासाठी विशेष होर्डिंगही तयार करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या नावे हे होर्डिंग आहे. यात जिल्हातील जवळपास सर्व शाळा डिजिटल, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, हॅण्ड वॉश स्टेशन, वाचन कुटी, रचनावादी शिक्षण, आपलकीची माणसे यात असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच ‘येथे शिक्षणच नाही तर आपुलकीही आहे’, असेही स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार २६ जून २०१७ पासून राबविण्यात येणाèया पटनोंदणी पंधरवाड्याची वाट न पाहता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालक-शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या मदतीने प्रवेश देण्यात आला. मागील वर्षी या उपक्रमा दरम्यान एकाच दिवशी १० हजार बालकांना तर यावर्षी १० हजार ९२२ विद्याथ्र्यांनी प्रवेश घेतला आहे. नवागतांचे स्वागत, मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले होते.