कीर्तन हे प्रबोधनाचे उत्तम साधन- मुख्यमंत्री

0
8

लातूर  दि. 25 :- आपल्या देशात शेकडो वर्षापासून कीर्तनाची परंपरा सुरू आहे.  कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य वर्षानुवर्ष करत असून कीर्तन समाज प्रबोधनाचे उत्तम साधन असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
खरोसा ता. औसा येथील रेणुकादेवीचे दर्शन काल मुख्यमंत्री  फडणवीस यांनी घेतले. त्यावेळी येथे सुरू असलेले कीर्तन मुख्यमंत्र्यांनी ऐकले. यावेळी खरोसा येथील सरपंच व कीर्तनकार प्रशांत खानापुरकर  यांच्या  हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, आमदार बसवराज पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, हे  सुरांचे कीर्तन असून या माध्यामातून समाज मनावर  चांगल्या विचारांची पेरणी होती. त्यामुळे अशा विचारांतून जीवन ही चांगले होत असते.भारतात प्राचीन काळापासून कीर्तनाच्या माध्यामातून किर्तनकरांनी देश,संस्कृती व समाजाची फार मोठी सेवा केलेली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आजच्या  काळात ही कीर्तनकार समाजाचे प्रबोधन करून समाजात स्फुल्लींग निर्माण करण्याचे कार्य करतात. समाजातील  अनिष्ठ रुढी परंपरावर प्रहार करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत. तसेच आज येथील कीर्तनातून तुकोबा महाराजांचे विचार ऐकायला मिळाल्याने  आपल्याला आनंद झाला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.