राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणार -मुनगंटीवार

0
12

अमरावती,दि.08-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्वज्ञान आजीवन अमलांत आणून त्यांच्या तत्वज्ञानाला, विचारांना हाणी पोचेल असे कृत्य माझ्या हातून घडणार नाही. त्यांचे विचार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आजन्म परिश्रम करणार असे प्रतिपादन राज्याचे वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते आज 8 जून रोजी अमरावती जिल्हयातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरूकुंज मोझरी येथील आश्रमात शपथ ग्रहण प्रसंगी बोलत होते. पुढे म्हणाले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला दिला. त्या विचाराची समाजाला आज नितांत गरज आहे. संतांचे विचार हे भौतिक साधनांच्या पुढे जाऊन आत्मिक समाधान देणारे आहेत. माणसाचे मन घडविणारे हे विचार सेवेचा मंत्र देणारे आहेत.

अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या संचालक पदी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आज संचालक म्हणून शपथ ग्रहण केली. संचालक मंडळाच्या उपाध्यक्षा पुष्पाताई बोंडे यांनी त्यांना शपथ दिली. या वेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देत त्यांच्या स्मृतीला वंदन केले. या वेळी अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, डॉ. वाडेकर, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा निवेदिता दिघडे, लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, मंडळाचे सदस्य भानुदास कराळे, विलास साबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.