टी-१२ वाघिणीसह सेल्फी पार्इंट सेवेत

0
10

चंद्रपूर,दि.14 : वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे. त्यामुळे ताडोबाला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील वाघ व उपलब्ध जीवसृष्टीतील अन्य प्राण्यांची ओळख, माहिती आणि महत्व पटवून देण्यासाठी त्यांच्या प्रतिकृती लवकरच उभारल्या जाईल. लोकप्रिय टी-१२ वाघीण व छाव्यांची प्रतिकृती त्यांची सुरुवात असल्याची माहिती राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.गुरुवारला सायंकाळी मोहुर्ली येथील ताडोबा प्रवेशव्दारावर त्यांनी ताडोबातील लोकप्रिय टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांच्या प्रतिकृतीचे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनकर्मचारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण केले.
ताडोबाची ओळख जागतिकस्तरावर होत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात पर्यटक पराक्रमाचे प्रतिक असणाऱ्या वाघाला बघायला ताडोबामध्ये येत आहेत. अशा पर्यटकांना वाघासोबतच अन्य प्राण्यांचीही माहिती या ठिकाणी उपलब्ध करावी, असा आपला मानस आहे. त्यादृष्टीने टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांची प्रतिकृती आज लोकार्पित केली. ही सुरुवात आहे. ताडोबा जंगल जैवविविध सृष्टीने नटले असल्यामुळे अन्य प्राण्यांची प्रतिकृतीदेखील उभारण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.यावेळी मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, उपवनसंरक्षक किशोर मानकर यांनीही संबोधित केले.
कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, जि.प.सभापती ब्रिजभुषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, उपवनसरंक्षक किशोर मानकर, उपसंचालक जी.पी.नरवणे आणि नगरसेवक रामपाल सिंग उपस्थित होते.