परंपरेला फाटा देऊन पत्नीचे देहदान

0
9

नागपूर,दि.23-जन्म आणि मृत्यू कोणत्याही धर्मात अत्यंत नाजूक म्हणून ओळखली जाते. पाप-पुण्याचे जग आभासी असले तरी त्याकडे अत्यंत भावनेने पाहिले जाते. कुटुंबातली एखादा व्यक्ती कायमचा कमी होणे ही प्रत्येकासाठीच नाजूक बाब असते. पण ती जर जीवनाची सहचरणी असेल तर हा क्षण अधिक हळवा होऊन जातो. पण, त्याहीपलीकडच्या जगाचे वास्तव स्वीकारणे फार क्वचित जणांना जमते. नागपुरातील ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ आणि हळवे सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा कांबळे यांनी अतीव दुःखद घटनेनंतरही डोळ्यांत आसवांचा एकही थेंब थबकू न देता काळजावर दगड ठेवत हे धाडस करून दाखविले. डॉ. कांबळे यांच्या पत्नी लीला यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना जडलेल्या कर्करोगाशी त्यांनी दिलेली झुंज अखेर थांबली.
लीला या गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या कर्करोगाशी झुंजत होत्या. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. कर्करोगामुळे त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या किडनीवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शल्यक्रियाही करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सोमवारपासून किमोची पहिली साखळी सुरू केली जाणार होती. मात्र, शनिवारीच त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. यातच त्यांचे दुपारी १२ च्या सुमारास निधन झाले. डॉ. कांबळे यांच्या पत्नीचे देहावसान झाल्याचे कळताच त्यांच्या घरासमोर आप्तस्वकियांनी गर्दी केली.कर्करुग्णांच्या परिस्थितीची जाण असलेले हळवे सामाजिक कार्यकर्ते अशी डॉ. कांबळे यांची ओळख आहे. सहचरणी अशी अर्ध्यावर डाव सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्यानंतरही डॉ. कांबळे यांनी कर्करुग्णांविषयी असलेली कणव कमी होऊ दिली नाही. परंपरेला फाटा देत त्यांनी पत्नीला अनोखा निरोप देण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्यांनी पत्नीचा देह एकही नवा कोरा कपडा खरेदी न करता दिला. आहे त्याच वस्त्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाला हा देह त्यांनी दान केला. शिवाय, अंत्यविधी आणि तेरावीच्या कार्यक्रमाला जो काही खर्च अपेक्षित असेल, तो पैसा स्नेहांचल या कर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान करण्याचा निर्णय घेतला.