गोंदियाच्या हृदयामुळे मुंबईच्या तरुणाला जीवनदान

0
27

गोंदिया,दि.24- येथील रेलटोली निवासी पशीने कुटुंबातील सदस्याचा ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याचे डाॅक्टरांनी सांगताच पशीने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या परिस्थितितही स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पशीने कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.त्या संयम आणि मानवतावादीच्या भूमिकेमुळे चौघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे,येथील या मेंदू मृत व्यक्तीचे हृदय मुंबईच्या तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. झनेश पशीने (49) रा. रेलटोली गोंदिया असे मेंदू मृत दात्याचे नाव आहे.
झनेश पशीने यांना 21 आॅगस्ट रोजी घरीच मेंदू पक्षाघाताचा झटका आला. त्यांना तातडीने गोंदिया येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना नागपुरात हलविले. येथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर मेंदू मृत असल्याचे घोषित केले. माणूस गमावल्याचे असह्य दु:ख असतानाही त्यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचा दोन मुलींनी पुढाकार घेत अवयव दानाचा निर्णय घेतला. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नागपुरातील दुसºया एका खासगी इस्पितळात गुरुवारी दुपारी 2 वाजता हृदय व यकृत काढण्याला सुरूवात झाली. 2 वाजून 19 मिनिटांनी हृदय व यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी रवाना झाले. या हॉस्पिटलमधील एका 33 वर्षीय तरुणावर त्याचे यशस्वी प्र्रत्यारोपणही करण्यात आले. या दोन अवयवाशिवाय किडनी, डोळे व त्वचाचेही दान करण्यात आले. नागपुरात पहिल्यांदाच हृदयासाठी आॅरेंजसिटी हॉस्पिटल ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडोअर करण्यात आला.