जन वन योजनेचा लाभ घ्या-पी.बी.वाडे

0
11

मंगेझरीत संवाद पर्व
गोंदिया,दि.३० : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगत जी गावे आहेत त्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना आहे. या क्षेत्रालगत असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या विकासासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.वाडे यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथे २९ ऑगस्ट रोजी वनश्री गणेशोत्सव मंडळ, सातपुडा फाऊंडेशन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित संवाद पर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.वाडे बोलत होते. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, मंगेझरीच्या सरपंच अनुसया कुमरे, ग्रामपंचायत सदस्य बंडू मरसकोल्हे, वनसंरक्षक के.बी.कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.वाडे पुढे म्हणाले, या योजनेतून ग्रामस्थांचे वनावरील अवलंबीत्व कमी व्हावे यासाठी ग्रामस्थांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहे. सोबतच गॅस शेगडी ठेवण्यासाठी ओटे, कोणी उघड्यावर शौचास जावू नये यासाठी शौचालय बांधून देण्यात येत आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होवू नये यासाठी शेतीला सौर कुंपन लावून देण्यात येत आहे. वन्यप्राणी शेतातील विहिरीत पडू नये यासाठी विहिरीला कठडे लावून देण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुक्ष्म नियोजन आराखड्यानुसार या योजनेतून ग्रामविकासाची कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.सोसे म्हणाले, शासनाच्या अनेक घटकांसाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधी या योजना समजून घेणे महत्वाचे आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाती आज आर्थिक व राजकीय सत्ता आली आहे. माविम तिरोडा तालुक्यातील ११४ गावात काम करीत असून १७८० बचतगटाच्या माध्यमातून २३ हजार महिला जुळल्या आहेत. ११०० महिला बचतगटांना दोन वर्षात दीड कोटी रुपये निधी उद्योग व्यवसायासाठी माविमने त्यांना उपलब्ध करुन दिला आहे. बचतगटातील महिलांनी आता आर्थिकस्थिती भक्कम करण्यासाठी बकरी पालनाचा व्यवसाय सुरु करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्रीमती कुमरे म्हणाल्या, या संवाद पर्वामुळे मंगेझरीच्या ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. आता ग्रामस्थ निश्चित शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावात जे बेरोजगार आहेत त्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे. ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. गावातील शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे त्या म्हणाल्या. श्री.मरसकोल्हे यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी श्री.खडसे यांनी संवाद पर्व आयोजित करण्यामागचा उद्देश उपस्थित ग्रामस्थांना सांगितला. शासनाने नुकतीच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांनी १५ सप्टेबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बेरोजगारांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा तसेच कौशल्य विकासाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वावलंबी व्हावे. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनरक्षक श्रीमती व्ही.एन.मेहर, श्रीमती एच.डी.आस्वले, श्री.वाटघुळे, श्री.गायधने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मुकूंद धुर्वे यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.