शेतकर्‍यांच्या मुलांनी आंदोलनात सहभागी व्हावे – प्रा. वाकुडकर

0
19

भंडारा,दि.03-शेतकर्‍यांच्या प्रश्नांना हात घालून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून शेतकर्‍यांना नागावले जात आहे. न्याय हक्कांसाठी उभारलेले शेतकर्‍यांचे आंदोलन फोडून काढले जात आहेत. शेतकर्‍यांप्रती अश्लिल भाषेचा वापर केला जात आहे. हा प्रकार निंदनीय असून आता शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी त्यांच्या मुलांनीच आंदोलनात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत युथ फॉर स्वराज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी मांडले.
‘बळीराजाचा मुला’ या संवाद अभियानानिमीत्त ते भंडार्‍यात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सदर अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी वर्धा येथील प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातून करण्यात आली आहे. देशाचे राजकारण बदलविण्याची ताकद महिलांमध्ये असल्याने महिलांनाच केंद्रबिंदू मानून हे अभियान सुरू करण्यात आल्याचे वाकुडकर म्हणाले की, देशात शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यांना हात देण्याऐवजी केंद्र व राज्य सरकार शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत आहे. मी पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांचा दौरा केला. यात दौर्‍यात एकाही शेतकर्‍याला १0 हजारांची अनुदान राशी मिळाली नसल्याची माहिती समोर आली. कर्जमाफीची घोषणा झाली तर त्यात विविध १५ पानांचे फॉर्म भरण्याची भानगड निर्माण झाली. शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी लावला. बळीराजाचे आंदोलन फोडून काढणारे, त्यांना नागावणार्‍या सरकारला आता वठणीवर आणण्याची गरज असून शेतकर्‍यांच्या मुलांनीच या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वाकुडकर यांनी केले. ४ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता मुंबई येथील आझाद मैदानावर होणार असून त्यात भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मुले सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी युथ फॉर स्वराजचे राष्ट्रीय अध्यक्ष मनिष कुमार, महाराष्ट्र प्रभारी महादेव मिरगे, अँड. शकील अहमद, भंडारा पॅरामेडीकल कॉलेजचे संचालक डॉ. अनिल कुर्वे उपस्थित होते.