ज्येष्ठ कवी गेडाम यांनी विद्यार्थ्यांना वितरीत केले साधना साप्ताहिकाचे ५० दिवाळी अंक

0
30

गोरेगाव,दि.14- वाचनसंस्कृती वाढावी व मूल्यजाणीवांचा संस्कार व्हावा, यासाठी भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्तं आयोजित वाचन प्रेरणा दिन  कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहगाव ( तिल्ली ) येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मार्गदर्शक व विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी व समीक्षक माणिक गेडाम उपस्थित होते.त्यांनी साने गुरूजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे ५० दिवाळीअंक विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त वितरीत केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहगाव ( तिल्ली ) केंद्राचे केंद्रप्रमुख आर.आर.अगडे, प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बोपचे, सदस्य बाबुलाल गौतम उपस्थित होते.
मार्गदर्शनात श्री. गेडाम यांनी प्रकटवाचन, मूकवाचन शालेय जीवनात उच्चारण व मनन करण्यासाठी फार मोलाचे ठरते असे प्रतिपादन केले. विद्यार्थी चौकस श्रोते असण्याबरोबरच प्रश्न विचारणारे असावेत, जो प्रश्नच विचारत नाही त्याची अपेक्षित प्रगती होत नाही. यासाठी शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना उद्युक्त करून वेळोवेळी संधी देण्याचे कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राथमिक अवस्थेतच माझ्या श्री लोखंडे सरांमुळे मला रवींद्रनाथ टागोरांची गोरा कादंबरी उपलब्ध झाली. तिचे वेगवेगळ्या टप्प्यावर वाचन करून घेतल्यामुळे मला ती समजली, वाचनाच्या छंदामुळेच कविता वळणाला आली. याचमुळे मी १९६४ साली पहिली कविता लिहू शकलो. ती मासिकात प्रसिद्ध झाल्याने माझ्यासह माझ्या सर्व शाळेने आनंदोत्सव साजरा केला आणि माझा लेखनप्रवास सुरू झाला. काळीजकळ, दलितप्रेम असे कवितासंग्रह मी रसिकांना देवू शकलो.
यासमयी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शौर्य, धैर्य व कर्तृत्व गाजवणा-या टीली स्मिथ ब्रिटन, ककेन्या नटाया केनिया, शिझा शाहीद पाकिस्तान, रायन कॅनडा, विल्यम कायक्वांबा मलावी व किशन श्रीकांत भारत अशा एकूण ६ विद्यार्थ्यांच्या कार्यांबद्दल संक्षिप्त माहिती त्यांनी दिली.केंद्रप्रमुख अगडे यांनी, विविध स्तरातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सहाय्य करून त्यांचे मनोबल उंचावण्याचे कार्य सदैव केले जाते. केंद्रात हस्ताक्षर सुधार प्रकल्प, वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन, वह्या वाटप, स्पर्धेविषयक कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हेच प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगितले.प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक बी. सी. वाघमारे यांनी केले. सुत्रसंचालन अशोक चेपटे यांनी तर आभारप्रदर्शन तानाजी डावकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. एस. राऊत, कु. एल. के. ठाकरे,एच. के. धपाडे,अनिल मेश्राम यांनी सहकार्य केले.दरम्यान पालक, पदाधिकारी, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.