मंडईतील दंडार हाऊसफुल्ल!

0
51

खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.२५- झाडीपट्टी रंगभूमीतील दंडार… स्टेज म्हणून छोटेसे मंडप… प्रेक्षकांसाठी बसायला दरी… साऊंड सिस्टिमसाठी चार पॉवरफूल भोंगे… कलाकारही गावातील वा परिसरातीलच. पंधरा मिनिटात गुंडाळता येईल इतकासा पसारा. तरीही हजारो प्रेक्षक… दिवसभर जागेवरून न उठणारा. पाय ठेवायलाही जागा उरत नाही इतकी गर्दी. शहरी भागात प्रसिद्ध कलावंतांच्या नाटकांसाठी, शोजसाठी जाहिरातबाजी केल्यानंतरही प्रेक्षक मिळत नाही. सभागृह भरणार की नाही याची धाकधुक लागून असते. पण, इथे हाऊसफुल्ल गर्दी असते.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार जिल्ह्यांचा प्रदेश म्हणजे झाडीपट्टी. दिवाळीपासून महाशिवरात्रीपर्यंत झाडीपट्टीत दिवसा दंडार आणि रात्री पाहुण्यांसाठी नाटकांची मेजवाणी अशी परंपराच आहे. यातही दंडारीला विशेष महत्त्व आहे. दंडार ही झाडीपट्टी रंगभूमीची गंगोत्री. या कलेतूनच नंतर झाडीपट्टी रंगभूमी बहरली. म्हणूनच मंडईतील कार्यक्रमांची सुरुवातही यापासूनच होते. केवळ नातेवाइकांच्या मनोरंजनासाठी सादर होणाऱ्या दंडारीच्या उद्देशात आज इतक्या वर्षांनंतरही फारसा फरक पडलेला नाही. कलाकारही हौशी आहेत. पुरुषच नटीची भूमिका वठवितो. यात कुणीही बाहेरून दंडार बसविण्यासाठी किंवा आपली कला सादर करण्यासाठी आलेला नाही. प्रेक्षकही ठरलेला आहे. त्यामुळे काहीही केले, कसेही सादर केले तरीही रसिक स्वीकारणारच याची खात्री आहे. म्हणूनच या रंगभूमीवर प्रेक्षकांसाठी साध्या सोयीही नसतात. बसायला केवळ दरी, ती अपुरी पडली तर शेकडो मंडपाच्या सभोवताल उभे असतात. साउंड सिस्टीमची आगवळीवेगळी रचना असते. रंगमंचाच्या मधोमध एक पॉवरफुल माइक लावलेला असतो. प्रत्येकवेळी पात्र त्या माइकसमोर येऊन संवाद म्हणतो. गाणी, नकला सादर करतो. एकाच गावात तीन ते चार दंडार मंडळ असल्यास आपण सर्वोत्कृष्ट हे दाखविण्यासाठी कलाकारांचा आवाज डेसिबल्सच्या पलीकडेही जातो. नॉनस्टॉप दीडशेवर प्रयोग करणारे कलाकारही या रंगभूमीत सापडतात. प्रॉम्पटरच्या मदतीने बेमालूम अभिनय करणारी नटमंडळी आणि गावागावांतून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून त्यांना दाद देणारे प्रेक्षकही याच मातीत आहेत. आधी दंडारची कुठलीही स्क्रिप्ट नव्हती. पिढीजात ही कला हस्तांतरीत होत गेली. पण, झाडीबोलीचे अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर यांनी पुढाकार घेत दंडारची स्क्रिप्ट तयार केली आहे. बोरकर यांच्या सात पिढ्यांपासून दंडार सादर केली जाते.

मंडई उत्सव

दिवाळीतील बलीप्रतिपदेचा दिवस संपताच भाऊबीजेपासून मंडई उत्सवाला सुरुवात होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी हंगामाला अनुसरून या उत्सवाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. वर्षभर शेतात राबणारा शेतकरी मंडईत अनेक प्रकारची खरेदी करतो. मंडईत मनोरंजनासाठी नाटक, तमाशा, खडी गंमत, दंडार यासारख्या लोककलांचे आयोजन केले जाते. झाडीपट्टीची दंडार ही लोककला राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचली आहे. दंडार ही अनेक लोककलांची जननी मानली जाते. ग्रामीण भागात अन्य कुठलीही मनोरंजनाची साधने नव्हती, तेव्हा दंडारीची उत्पत्ती झाल्याचे बोलले जाते. रेडिओ, टीव्ही, सिनेमाघर ही मनोरंजनाची साधने आल्यानंतरही मंडईचे महत्व कमी झाले नाही. मंडईनिमित्त जवळपासच्या नातेवाइकांकडे जाऊन पाहुणचार घेण्याची परंपरा आजही आहे. अनेक ठिकाणी उपवर-वधूंचे विवाह ठरविण्यासाठी मंडई हे माध्यम ठरत होते. कालानुरुप आता त्यात बदल झाला असला तरी अजनूही काही गावे ही परंपरा जोपासत आहेत.