शेतकर्यांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?-मकरंद अनासपुरे

0
17

गोंदिया,दि.30 : परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळसह अनेक जिल्ह्यातील शेतकर्ंयांचा नाहक बळी गेला. त्यानंतर शासन आणि प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळले. यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र हेच आधी केले असते तर शेतकर्यांचा जीव गेला नसता.त्याचप्रमाणे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धानाला जर २५०० रुपये हमीभाव दिला तर शेतकरी आत्महत्येपासून स्वतःला सावरु शकतील.त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती हवी पण तशी दिसत नसल्यानेच शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याची प्रतिक्रिया देत  हे शासन आणि प्रशासनाचा नाकर्तेपण असल्याची टीका सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे केली.या कार्यक्रमाला आमदार परिणय फुके,नगराध्यक्ष अशोक  इंगळे,जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील,डाॅ.रवी धकाते,शिल्पा सोनोने,अनंत वालस्कर,मानिक गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंदिया येथे एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.यवतमाळ येथील घटनेकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. जी काळजी प्रशासन आता घेत आहे, ती आधीच घेतली असती तर शेतकºयांच्या कुटुंबांवर हे संकट ओढवले नसते. कीटकनाशक फवारणीमुळे २० ते २५ शेतकºयांचा जीव गेल्यानंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर हे दुर्देवच म्हणावे लागेल. आधीच या जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि कर्जामुळे हताश आहेत. त्यातच पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी केल्याने जीव गमवावा लागत आहे. हे दोन्ही चित्र फार दुर्देवी आहे. प्रशासनाने या घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखून उपाय योजना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.
लागवड खर्चाच्या तुलनेत अद्यापही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकºयांवरील कर्जात सातत्याने वाढ होते. त्यातच बाजारपेठेतील दलालांकडून शेतकºयांचे आर्थिक शोषण केले जात आहे. जोपर्यंत या सर्व गोष्टींचे चित्र बदलणार नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध आणि सुखी होणार आहे. शेतकरी विरोधी धोरणे आणि धारणेमुळेच शेतकºयांची आज ही स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत असल्याचा आरोप अनासपुरे यांनी केला.

दरम्यान या खासगी कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यातील 55 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांना आर्थिक मदत देण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी गोळा करण्यात आला.सुरवातीला 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.मात्र कार्यक्रमाच्यावेळी ज्यांना मदत देण्यात आली,त्यांच्या पॅकेटमध्ये फक्त दीड हजाराची मदत निघाल्याचे बघावयास मिळाल्याचे अनेकांनी सांगितले.तर ज्या काही व्यवसायिक,समाजसेवी व अधिकार्यांना आपण भाऊबीज म्हणून दिलेली रक्कम पुर्णपणे दिलीच गेली नसल्याचे कळले तेव्हा त्यांपैकी काहींनी अशा प्रकारामुळेच प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली.कृषी विद्यापीठाचे माजी कुलगूरु डाॅ.निंबाळकर यांनीही आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली.