आदिवासी भागातील सहा हजार महिलांना ‘माहेर’ चा आधार-आरोग्य उपसंचालक

0
6

नागपूर,दि.2:- अतिदूर्गम आदिवासी तसेच दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या महिलांना सुरक्षित मातृत्व मिळावे, यासाठी विभागात सुरु करण्यात आलेल्या ५१ माहेर घराच्या माध्यमातून मागील तीन वर्षात ६ हजार ०६८ महिलांना सुरक्षित मातृत्व लाभल्याची माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल यांनी दिली.

ग्रामीण व अतिदूर्गम भागातील महिलांना बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच अतिवृष्टी व पूर सारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी बाळंतपणापूर्वीच राहण्याची सुविधा ‘माहेर घर’ या योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आली आहे. गर्भवती महिलेला प्रसुती पूर्वी माहेर घराच्या माध्यमातून वैद्यकीय तसेच भोजनासह आवश्यक सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येतात. गर्भवती महिलेसोबत सहाय्यक म्हणून राहणाऱ्या महिलेला तीची दैनंदिन मजुरीचा मोबदला म्हणून दरदिवशी शंभर रुपये सुध्दा या योजनेअंतर्गत देण्यात येते.
नागपूर विभागात ५१ माहेर घर सुरु असून या मध्ये गोंदिया जिल्हयात १३, चंद्रपूर जिल्हयात ७, तर गडचिरोली जिल्हयात ३१ माहेर घर असून सर्व माहेर घर आरोग्य केंद्राच्या परिसरात सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षित बाळंतपण ही संकल्पना असल्याचे सांगतांना डॉ. संजीव जयस्वाल म्हणाले की, सन २०१३-१४ या वर्षात २ हजार १६९, सन २०१४-१५ मध्ये १ हजार ९१३, तर २०१५-१६  या वर्षात १ हजार ९८६ सुरक्षित बाळंतपण झाले आहेत.नागपूर विभागात सरासरी ९८ टक्के बाळंतपण हे आरोग्य केंद्र अथवा संस्थात्मक सुविधा असलेल्या ठिकाणी होत असल्याचे सांगतांना डॉ. जयस्वाल म्हणाले की, जिल्हयात एलथ्री २५ (डिलवरी पाँईट) ऑपरेशनची सुविधा आहेत. यामध्ये भंडारा जिल्हयात ३, चंद्रपूर ५, गोंदिया ४, गडचिरोली ४, वर्धा ३ व नागपूर जिल्हयात ६ केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावर एप्रिल-२०१६ पासून ९ हजार ०२३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ही केंद्रे जिल्हा आरोग्य केंद्रा व्यतिरिक्त असल्यामुळे बाळंतपणाच्या वेळी आवश्यकतेनुसार या केंद्रामार्फत तालुक्याच्या ठिकाणीही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाली आहे.