प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे युनेस्कोच्या परिषदेसाठी निमंत्रित

0
27

गडचिरोली, दि.१९: युनेस्कोतर्फे थायलंडमधील बँकाक येथे २३ व २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.आशिया पॅसिफिक विभागातील १० देशांमधील सुमारे ६० शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  त्यात भारतातील तीन जणांचा समावेश असून, राजाभाऊ मुनघाटे हे त्यापैकी एक आहेत. उच्च शिक्षणातील विशिष्ट विषयात गुणवत्तेची मानके विकसित करण्यासाठी कोणते मापदंड असावेत, याविषयी या परिषदेत तज्ज्ञ मंडळी चर्चा करणार आहेत. पुढील १३ वर्षांत उच्च शिक्षणात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेऊन २०३० सालचे शिक्षण कसे असेल, याविषयीचा आराखडा ही परिषद तयार करणार आहे. पदव्युतर शिक्षणातील अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक वारस्याचे व्यवस्थापन, तसेच २०३० सालचे शिक्षण डोळ्यापुढे ठेवून संशोधनाचा आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासंदर्भातही या परिषदेत विस्तृत विचारविमर्श करण्यात येणार आहे.

आतापर्यंत डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांनी विविध शैक्षणिक परिषदांमध्येही सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे. १५ व १६ जून २०१७ रोजी चीनमधील शेंजेन येथे झालेल्या युनेस्कोच्या परिषदेत डॉ.राजाभाऊ मुनघाटे सहभागी झाले होते. ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तेची हमी व आव्हाने’ हा त्या परिषदेचा विषय होता. युनेस्कोने निमंत्रित केल्याबद्दल प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.