नक्षलग्रस्त भागात राहून गावकर्‍यांना मार्गदर्शन

0
9

केशोरी : नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी कसेतरी त्या भागातील दिवस काढून लवकरात लवकर तेथून बदली करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र भरनोली (राजोली) या एओपीला कार्यरत उपनिरीक्षक बसराज चिट्टे यांनी गावकर्‍यांना आपलेसे करून येथील युवकांसाठी अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच त्यांच्या बदलीनंतर त्यांना निरोप देताना गावकरी भावूक झाले होते.
नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील एओपी भरनोली (राजोली) येथे कार्यरत पो.उपनिरीक्षक बसराज चिट्टे यांनी नोकरीचा ताण सांभाळून गावासाठी तरुण सुशिक्षित मुलांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत भरनोलीतर्फे एका छोट्याखानी समारंभात चिट्टे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला.
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काशिमजमा कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश पाटील गहाणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र , शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती तानेश ताराम, सरपंच पुष्पा कर्‍हाडे, युवा नेता ग्रा.पं. सदस्य गौवर्धन पाटील ताराम आणि गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. उपनिरीक्षक चिट्टे यांनी जिल्ह्याची त्याचबरोबर जगाची माहिती वृत्तपत्राद्वारे मिळावी यासाठी एओपी येथील वाचनालयात सर्वच वृत्तपत्रे उपलब्ध करुन दिली. या वाचनालयाचा गावकरी व सुशिक्षित बेरोजगार घेत आहेत. त्यांनी गावात सुद्धा समाजिक कार्य करुन आपल्या कार्याची छाप पाडली आहे. त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य पाहून गावातील लोक भारावून गेले आहेत.दीपस्तंभ मार्गदर्शन केंद्र आणि ग्रामपंचायत भरनोली (राजोली) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांच्या आग्रहावरुन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा हा सत्कार झाला.