मोबाईलवरून ‘भाग्यशाली’ ग्राहकांची फसवणूक

0
8

भंडारा : ‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के अनुसार हमारे आश्रमने आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र. इसके लिए आपको सिर्फ दो हजार ९०० रु पये देने होंगे’, असे कॉल तुमच्या मोबाईलवर आले तर सावध रहा. नागरिकांना ‘ईमोशनल ब्लॅकमेल’ करून ठगविण्याचे प्रकार वाढले आहेत. टेलिमार्केंटिंगचा गैरवापर करून ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आले आहे.

सध्या मोबाईलवर असे अनेक प्रकारचे मॅसेज आणि कॉल येत आहेत. ईश्वर आणि धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन विविध यंत्र विकण्याचा सपाटा सुरू आहे. एवढेच नाही तर दूरचित्रवाहिन्यांवरून ग्राहकांना भुरळ घातली जात आहे. प्रसिद्ध व्यक्तीच्या वलयाचा फायदा घेत त्यांना फायदा झाला. तुम्हालाही फायदा होईल, असे म्हणत, भाग्योदय यंत्र ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. धार्मिक संभाषण करून आधी भावनिक करायचे आणि त्यानंतर यंत्राचा बाजार मांडून त्याला ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. याला अनेक नागरिक बळी पडत आहेत.

कर्जासाठी झाली आपली निवड !

आमची दिल्लीतील एक प्रसिद्ध फायनान्स कंपनी आहे. कंपनीने कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी तुमची निवड केली आहे. एक लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला केवळ तीन टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल. कर्ज मिळण्यासाठी आवश्यक ‘प्रोसेसिंग फी’ करिता कर्जाच्या रकमेच्या १० टक्के म्हणजे १० हजार रुपये रोख किंवा चेकद्वारे कंपनीच्या खात्यात जमा करा, त्यानंतर चार दिवसात तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल, असा फोन भंडारा सचिन गिऱ्हेपुंजे यांना आला. त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे समोरील व्यक्तीने फोन ठेवला. सतर्कतेमुळे त्यांची फसवणूक टळली.