पापड येथे ओबीसी सेवा संघाचे आठवे राज्यस्तरीय अधिवेशन

0
10

गोंदिया,दि.8ः ओबीसी सेवा संघ यांच्यातर्फे रविवारी १० डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ (वाढोणा) येथे आठव्या राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उद्या शनिवारपासूनच निघणार आहेत.तर रविवारला ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाचे काही पदाधिकारी,कार्यकर्ते बसने रवाना होणार आहेत.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मस्थान असलेल्या नांदगाव तालुक्यातील पापळ (वाढोणा) येथे अधिवेशन होत आहे. यात देशातील आणि राज्यातील ओबीसी समुदायाची सद्यस्थिती आणि विकासाच्या संधी व त्यात असलेले अडथळे याविषयी विविध मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनात सकाळी नऊ वाजता संविधान दिंडी काढण्यात येईल. अप्पर आदिवासी विकास आयुक्त डॉ. माधवी खोडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे असतील. यावेळी ज्येष्ठ ओबीसी विचारवंत नागेश चौधरी यांच्यासह देशभरातील विविध आयएसएस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी १२ वाजता प्रा. श्रावण देवरे यांचे प्रशासनातील ओबीसी आव्हाने आणि उपाय या विषयावर व्याख्यान होईल. तिसऱ्या सत्रात दुपारी अडीच वाजता डी. ए. दळवी यांचे कौशल्य विकासातून ओबीसींचे सबलीकरण यांचे व्याख्यान होईल. याच अधिवेशनात बळी संदर्भ या पाक्षिकाचे अनावरण तसेच ओबीसी सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची सहविचार सभा होणार आहे. या अधिवेशनाला नाशिकमधून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजबांधव जाणार आहेत.