धानासोबतच शेतकऱ्यांनी नगदी पिक घ्यावे—जिल्हाधिकारी 

0
14

• लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वितरित
• 1 कोटी रुपये अनुदान स्वरुपात वितरित
भंडारा,दि. 8 :- भंडारा जिल्हयात धानाची पारंपारिक शेती मोठया प्रमाणावर केली जाते. यावर्षी मावा तुडतुडा या रोगामुळे धान पिक संकटात आले आहे. अशा परिस्थितीत बहुपिक पध्दती महत्वाची असून शेतकऱ्यांनी आता धानासोबतच नगदी पिकाकडे वळण्याची आवश्यकता असल्याचे मत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले. कृषि विभागाच्या वतीने उन्नत शेती समृध्द शेतकरी अंतर्गत लाभार्थ्यांनी ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे वाटप कार्यक्रम तालुका कृषि कार्यालय, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला, मलबेरी व फळ आदी नगदी पिक घेण्याचा सल्ला दिला.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.बी. तरकसे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क सुरेंद मनपिया, उपविभागीय कृषि अधिकारी एस.पी. लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तालुका कृषि अधिकारी सुरेश गणवीर, महिंद्रा नागपूरचे ब्रीज श्रीवास्तव, लक्ष्मी अग्राेचे प्रकाश रहांगडाले, विजय पारधी यावेळी उपस्थित होते. उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 5 लाभार्थ्यांना ट्रॅक्टर तर 3 लाभार्थ्यांना रोटावेटर वाटप करण्यात आले. यात रघुनाथ काशिनाथ गजभिये सालेभर्डी, सविता सुधाकर कढव इंदुरखा, सुनिता रामलाल चौधरी आमगाव, वृंदा चिंतामन मेहर पलाडी, मनिषा तानाजी गायधने चिखली, सहदेव पांडुरंग उरकुडे चोवा, रतिराम नामदेव धुळसे वळद व रमेश किसनजी चौधरी चोवा या लाभार्थ्यांचा समावेश आहे.
उन्नत शेती समृध्द शेतकरी अंतर्गत ट्रॅक्टर व इतर अवजारे मिळण्यासाठी कृषि विभागाकडे नोव्हेंबर अखेर 7 कोटी 50 लाखाचे 840 अर्ज प्रापत झाले होते. या सर्व शेतकऱ्यांना कृषि विभागाने निवड पत्र दिले. यातील 300 शेतकऱ्यांनी पुर्वसंमती दिली. याची रक्कम 2 कोटी 50 एवढी आहे. या योजनेत 139 लाभार्थ्यांनी शेती अवजारे खरेदी केली. त्यांना कृषि विभागाने 1 कोटी रुपये अनुदान स्वरुपात वितरित केले. आज 5 ट्रॅक्टर व 3 रोटावेअर 8 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. या प्रस्तावाची रक्कम 32 लाख 24 हजार एवढी आहे. यावर कृषि विभागाने लाभार्थ्यांना 8 लाखाचे अनुदान दिले. तर शेतकऱ्यांची गुंतवणूक 24 लाख 24 हजार एवढी आहे.