उपायुक्त फुटाणेंची गोरेगाव पंचायत समितीला भेट

0
7

गोरेगाव,दि.28ः- नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्तांसह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी यांनी आज गुरुवार 28 डिसेंबरला गोरेगाव पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन मग्रारोहयो योजनेचा आढावा घेतला.सोबतच पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागाची पाहणी केली.पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाची तसेच आॅक्सिजन बगीच्याची पाहणी केली.(विकास) उपायुक्त कमलकिशोर फुटाणे,महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी प्रविण देशमुख,सहाय्यक आयुक्त (चौकशी) अनिल किटे यांंच्यासह गोंदिया जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे हे देखील उपस्थित होते.उपायुक्त फुटाणे यांनी अभिलेख कक्षाची प्रशंसा करीत बगीच्याची पाहणी करीत अजून सुंदर फुलझाडे लावण्यासोबतच लोकोपयोगी माॅडेलसुध्दा लावण्याचा सल्ला दिला.त्यानंतर तालुक्यातील खाडीपारजवळील चोपनटोली येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या विहीरीची पाहणी करुन तिरोडा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्राकडे रवाना झाले.गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे,सहाय्यक बीडीओ संताजी पाटील यांनी पंचायत समितीच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.यावेळी अधिक्षक पी.जी.शहारे, विस्तार अधिकारी ए.के.गिरेपुजे,विस्तार अधिकारी जी.टी सिंगनजुडे,विस्तार अधिकारी सी.सी.हरिणखेडे,रमेश ब्राम्हणकर,मनोज साकुरे,शंकर पारधी आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.