चंद्रपूरच्या विविध उत्पादनाचे ब्रँडींग करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर : चंद्रपुरातील वनऔषधी, हळद, शिंगाडा, मशरुम व तांदूळ यासारख्या कृषी उत्पादन मुंबई, दिल्लीच्या बाजारपेठेत मिळावे यासाठी ब्रँडींग करावे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. याप्रदर्शनीचे उद्घाटन श्री. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद ब्रिजभुषण पाझारे, पंकज पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनबादे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाने तयार केलेल्या हळद उत्पादन लोगोचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘मेक इन चंद्रपूर’ची सुरूवात खऱ्या अर्थाने झाली. राज्यात अल्पभुधारकांची संख्या वाढत असून शेती केवळ निसर्गावर आधारित आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यासोबतच तंत्रज्ञान वापरुन पूरक पीक घेतल्यास जमिनीची पोत सुधारुन उत्पादन वाढेल. यासाठी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. कृषी विद्यापीठ केवळ शोभेची वस्तु न ठरता शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचे काम विद्यापीठाने करावे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देऊन पालकमंत्र्यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतूक केले. यावेळी त्यांनी प्रदर्शनीमधील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. तसेच आत्महत्या केलेले शेतकरी सुरेश गिरसावळे यांच्या पत्नी नंदा गिरसावळे यांना धनादेश दिला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले आणि आमदार नाना शामकुळे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विद्या मानकर यांनी केले.