वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन

0
24

नांदेड- येथे उद्या दि.7 फेब्रुवारीपासून ते 9 फेब्रुवारीपर्यंत वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन चालणार आहे. या संमेलनाची पूर्ण तयारी झाली असून, संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंघ बादल यांची उपस्थिती राहणार असून, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा शुभारंभ होणार आहे.

नांदेड येथील श्री गुरुग्रंथ साहिब भवन येथे दि.7, 8 व 9 फेब्रुवारी 2015 रोजी हे मराठी संत साहित्य संमेलन विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंघ बादल, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पहिल्याच दिवशी उपस्थिती राहणार आहे. या संमेलनाचा समारोप पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते तसेच वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.विठ्ठल पाटील, सचिव ह.भ.प. डॉ.सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ह.भ.प.प्रा.डॉ.शिवाजीराव मोहिते आळंदी हे भुषविणार आहेत. कार्यक्रम वेगवेगळ्या सत्रांमध्ये होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, संत बाबा कुलवंतसिंघ, आमदार अमिता चव्हाण, खासदार रामदास तडस, आमदार हेमंत पाटील, आमदार रामराव वडकुते, आमदार प्रतापराव चिखलीकर, महापौर अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, जि.प.अध्यक्षा मंगला गुंडले, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता दिंडी सोहळा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या शुभ हस्ते सुरु होणार आहे. पहिल्या सत्रात दुपारी 2 ते 4 या वेळेत संत विचार आणि आंतरभारती या विषयावर राज्यातून आलेले प्रमुख अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. दुसर्‍या सत्रात दुपारी 4 ते 6 या वेळेत संतांची जीवनदृष्टी आणि समाजसेवा असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते नऊ मिराताई शेंडगे व जयश्री गंगाखेडकर यांचे भजन होणार आहे. तिसर्‍या सत्रात सकाळी 9 ते 11 संत साहित्यातील संवादतत्व तर चौथ्या सत्रात संत साहित्यातील विज्ञान विचार तसेच पाचव्या सत्रात दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान संत साहित्याचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव, सहाव्या सत्रात दुपारी 3 ते 5 या वेळेत संत साहित्यातील स्त्री दर्शन आणि सातव्या सत्रात सायंकाळी 5 ते 7 या वेळेत शिख-मराठा अनुबंध या विषयावर विविध भागातून आलेले प्रख्यात ह.भ.प.आपले विचार व्यक्त करणार आहेत. त्याच दिवशी रात्री 10 ते 12 पर्यंत सत्यपालची सत्यवाणी हा कार्यक्रमही होणार आहे.