१० ते १४ फेब्रुवारी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम

0
200

जगातील १२ कोटी लोकांना हत्तीरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी ४० टक्के हत्तीरोगाचे रुग्ण भारतात आहे. देशातील पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, केरळ, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील काही भागात हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, ठाणे, नागपूर, वर्धा, गडचिरोली व नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे रुग्ण आढळतात. गोंदिया जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ०.२ टक्के रुग्ण आहेत. हत्तीरोग रुग्णाला अत्यंत शारीरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. जर एखादयाला हा रोग झाला तर तो बरा होत नसल्यामुळे रुग्णाची त्यातून सुटका नाही.
हत्तीरोग रुग्णाला विद्रुप अशी शारिरीक विकृती घेवून जगतांना त्यांच्या मनात शरमेची भावना निर्माण होते. हे रुग्ण नेहमीप्रमाणे कामधंदा नीट न करु शकत असल्यामुळे त्याला अर्थाजनातही बाधा निर्माण होवू शकते. त्यामुळे पर्यायाने त्याचा परिणाम म्हणजे देशाच्या एकूण मणुष्यबळामध्ये घट येते. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून राष्ट्रीय हत्तीरोग निर्मुलन कार्यक्रम भारतात १९५५ साली सुरु करण्यात आला आहे.
हत्तीरोग हा डासांमुळे फैलणारा रोग आहे. क्युलेक्स डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. जंतू असलेली मादी चावल्यास वेळेस संसर्ग होतोच असे नाही. कारण हत्तीरोगाचे जंतू हे मादीमार्फत त्वचेवर सोडले जातात. हे जंतू स्वत: त्वचेवर जखम/छिद्र शोधून आत शिरण्याचे काम करतात. दुषित डास वारंवार चावल्यानंतर काही व्यक्तींनाच हत्तीरोगाची लागण होते.
हत्तीरोगग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरीया जंतू असू शकतात. सुरुवातीच्या काळात कोणतीही बाह्य लक्षणे व चिन्हे दिसत नसल्यामुळे असे लोक ओळखता येत नाही. डी.ई.सी. व अल्बेडाझॉल गोळ्यांच्या सेवनामुळे रुग्णांचे शरिरातील मायक्रोफायलेरीया जंतू मरतात. मायक्रोफायलेरीया जंतूचा नायनाट झाल्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्यामुळे समाजातील पात्र लाभार्थ्यांनी डीईसी गोळ्या घेतल्या पाहिजे. डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांच्या सामुदायिक सेवनामुळे समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी होवून हत्तीरोगाचे दूरीकरणासाठी मदत होईल.
हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या लोकसंख्येतील गरोदर महिला, दोन वर्षाखालील बालके व अतिगंभीर रुग्ण वगळून २ ते ५ वर्ष वयोगटासाठी डीईसी व अल्बेंडाझॉलची प्रत्येकी एक गोळी, ६ ते १४ वर्ष वयोगटासाठी डीईसीच्या दोन गोळ्या आणि अल्बेंडाझॉलची एक गोळी आणि पंधरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीत डीईसीच्या तीन गोळ्या व अल्बेंडाझॉलची एक गोळीचे सेवन करावे. डीईसीची गोळ्या वर्षातून एकदाच म्हणजे राष्ट्रीय हत्तीरोगाच्या दिवशी खावी. या गोळ्याची एक मात्रा रुग्णाच्या शरिरातील सर्व मायक्रोफायलेरीयाचा नाश करते. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते.
हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या रोगाचा प्रकार हा क्युलेक्स नावाच्या डासामुळे होतो. क्युलेक्स डास मुख्यता साठवलेल्या घाण पाण्यामध्ये अंडी घालून वाढतात. त्यामुळे घराभोवती डासोत्पत्तीची स्थाने निर्माण होवू नये याची काळजी घेतली पाहिजे. गटारी वाहती करावीत व खड्डे बुजवावीत. सेफ्टीक टँकच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. व्हेंट पाईपच्या वरच्या टोकाला जाळी बांधावी. झोपतांना किटकनाशकभारीत मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या दारे व खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
एकदा हत्तीरोग झाल्यावर कोणताही उपाय नाही. हत्तीरोग होवू नये म्हणून डीईसी गोळ्यांची एक मात्रा वर्षातून एकदा हत्तीरोग दिनी सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो. हत्तीरोगाचे सन २०१० वर्ष पर्यंत दूरीकरण करणे, समाजात नवीन हत्तीरोग रुग्ण तयार होवू न देणे, हत्तीरोग बाधित अवयवांची स्वच्छता व काळजी आणि हत्तीरोगाविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देणे हा सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा उद्देश आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १० ते १२ फेब्रुवारी २०१८ आणि शहरी भागासाठी १० ते १४ फेब्रुवारी २०१८ दरम्यान डीईसी व अल्बेंडाझोल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १० लाख ९२ हजार ९८७ आणि शहरी भागातील १ लाख ८८ हजार ८९७ अशा एकूण १२ लाख ८१ हजार ८८४ व्यक्तींना हया गोळ्या खावू घालण्यात येणार आहे.

संकलन- के.के.गजभिये