आबांची इच्छा- दहावे, तेरावे होणार नाही

0
5

तासगाव- माजी उपमुख्यमंत्री आबा ऊर्फ आर. आर. पाटील यांनी आपल्या मृत्यूनंतरही आपल्या पुरोगामी विचारांची एक झलक पून्हा एकदा दाखवून दिली. आपल्या मृत्यूनंतर दहावे किंवा तेरावे करू नये असे त्यांनी आपल्या मित्र परिवार आणि कुटूंबीयांना सांगितले होते. त्यांचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे ते ख-या अर्थाने पुरोगामी होते. इतकेच नाही तर मुलाकडून मुखाग्नी देण्याची परंपरा रुढ आहे त्याला फाटा देत आबांना त्यांच्या मुलासह मुलींनीही मुखाग्नी देत पुरोगामी महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श ठेवला.
मृत्यूनंतर दहाव्या दिवशी पिंडदान आणि तेराव्या दिवशी कार्य केले जाते. मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी हे विधी केले जातात. त्याची परंपराच आहे. मात्र असल्या गोष्टींवर आबांचा कधीही विश्वास नव्हता. ते ख-या अर्थाने पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळेच त्यांनी आपले मित्र दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह आपल्या कुटूंबीयांना या परंपरा पाळल्या जावू नयेत असे स्पष्टपणे सांगितले होते. हीच आपली अंतिम इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
आबांवर अंजनी येथील हॅलिपॅड मैदानात अंत्यसंस्कार केले जात होते. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनीच ही आठवण सांगितली. त्यामुळे १९ फेब्रुवारीला केवळ अस्ती विसर्जनाचाच विधी केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आबांच्या पुरोगामी विचारांना त्यांच्या कुटूंबीयांनीही बळ दिले. अंत्यविधीला महिला जात नाही. मुखाग्नी हा मुलगा देतो. मुलगा नसेल तर नात्यातील कोणी पुरूष मुखाग्नी देतो ही पंरपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र आबांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या कुटूंबीयांनी ती मोडीत काढली. आबांना मुखाग्नी देण्यात त्यांची मुलगी स्मिता आणि सुप्रिया यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपला भाऊ मोहीतलाही बरोबर घेतले. या तीनही भावंडांनी आबांना मुखाग्नी देत पुरोगामी महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श ठेवला. आबांचे विचार यापुढेही आम्ही पुढे नेवू हाच संदेश जणू यातून त्यांनी दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.