पोलीसांनी केली लोकसहभागातून पुलाची दुरुस्ती

0
10

गडचिरोली,दि.13 – एटापल्ली उपविभागंतर्गत येत असलेल्या कोटमी हद्दीतील कसनसूर ते रेगडी गावाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील एटावाही पुल यावर्षी झालेल्या पहिल्या जोरदार पावसाने वाहून गेला होतो. यामुळे चामोर्शी-घोट-कसनसूर मार्गावरून छत्तीसगडला जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद पडली होती. यामुळे घेऊन परिसरातील १५ ते २० गावातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण यासह अन्य सोयीसुविधांसाठी ये-जा करणे कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस दलाच्या जवानांनी लोकसहभागातून पुलाची दुरुस्ती केली.

या पुलाच्या दुरुस्तीसाठी कोटमी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी भरत नागरे, पोलिस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठुबे यांनी पुढाकार घेऊन एटावाही, कोटमी, कोंडावाही गावातील नागरिकांना सोबत घेऊन लोकसहभागातून श्रमदानाने या वाहून गेलेल्या पुलाचे बांधकाम हाती घेतले. पोलिसांनी एटावाही पुलावर लोकसहभागातून सिमेंट कॉंक्रीट व मातीचा भराव टाकून अवघ्या दोन दिवसात काम पूर्ण करून सदर पूल लोकांच्या वापरासाठी सुरळीत तयार करण्यात आला. या तयार करण्यात आलेल्या पुलामुळे या भागातील १५ ते २० गावांना फायदा झाला असून येण्या-जाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.